Join us  

मुकेश अंबानी एका सेकंदाला किती पैसे कमावतात माहित्येय?; वाचून अवाक व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 3:43 PM

या अहवालात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच काळात कोट्यवधी लोकांचे एकवेळच्या अन्नासाठीही मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देभारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च 2020नंतरच्या काळात भारतात 100 अब्जाधिशांच्या संपत्तीत तब्बल 12,97,822 कोटी रुपयांची वाढ झाली.हे पैसे देशातील 13.8 कोटी सर्वात गरीब लोकांत वाटल्यास सर्वांच्या वाट्याला तब्बल 94,045 रुपये येतील.

नवी दिल्ली - अब्जाधीश मुकेश अंबानी एका सेकंदात जेवढे पैसे कमावतात, तेवढी कमाई करण्यासाठी एक अकुशल मजुराला तीन वर्ष लागतील. तसेच अंबानी एका तासात जेवढे पैसे कमावतात, तेवढे कमावण्यासाठी एखाद्या मजुराला तब्बल दहा हजार वर्ष लागतील. गरिबी उन्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅमने (Oxfam) आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. हा अहवाल जागतीक आर्थिक स्थरावरील ‘दावोस संवाद’च्या एक दिवस आधीच जारी करण्यात आला आहे. 

या अहवालात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच काळात कोट्यवधी लोकांचे एकवेळच्या अन्नासाठीही मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले. ऑक्सफॅमचा अहवाल ‘इनइक्वॅलिटी व्हायरस’मध्ये सांगण्यात आले आहे, की मार्च 2020नंतरच्या काळात भारतात 100 अब्जाधिशांच्या संपत्तीत तब्बल 12,97,822 कोटी रुपयांची वाढ झाली. हे पैसे देशातील 13.8 कोटी सर्वात गरीब लोकांत वाटल्यास सर्वांच्या वाट्याला तब्बल 94,045 रुपये येतील. तसेच, कोरोना व्हायरस महामारी गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठे आरोग्य संकट आहे. यामुळे 1930च्या महामंदीनंतर सर्वात मोठे आर्थिक संकट उत्पन्न झाले आहे.

ऑक्सफॅमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर म्हणाले, अन्यायपूर्ण आर्थ व्यवस्थेत आर्थिक संकटातही श्रीमंत लोकांच्या संपत्तीत कशा प्रकारे वाढ होते, हे या अहवालातून सहज स्पष्ट होते. विशेष म्हणजे अशा काळात कोट्यवधी लोकांना जगणेही कठीन होते. बेहर म्हणाले, सुरुवातीला वाटले होते, की या महामारीचा सर्वांनाच सारख्याच प्रमाणावर फटका बसेल. मात्र, लॉकडाउननंतर दरी समोर येऊ लागली आहे.

या अहवालात सांगण्यात आले आहे, की लॉकडाउन काळात भारतातील अब्जाधिशांतच्या संपत्तीत 35 टक्क्यांनी वाढ झाली. अब्जाधिशांच्या संपत्तीच्या बाबतीत भारत अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया आणि फ्रान्सनंतर सहाव्या स्थानावर आला. महामारी आणि लॉकडाउनच्या काळात 12.2 कोटी लोकांचा रोजगार बुडाला. यात 9.2 कोटी (75 टक्के) अनौपचारिक क्षेत्राशी संबंधित होते. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सरिलायन्स जिओभारत