Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:36 IST

सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा भार पडणार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत घट होत आहे. मात्र लवकरच इंधन दर पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. तेल निर्यातदार देश उत्पादन कमी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे लवकरच इंधनाचे दर वाढू शकतात. आज सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढाल सुरू होताच ब्रेंट क्रूड ऑईलचा प्रति बॅरल दर 70.69 डॉलर इतका होता. शुक्रवारी हाच दर 70 डॉलरच्या खाली होता. आज दुपारी एक वाजता खनिज तेलाचा दर 71.61 डॉलर इतका होता. ही आकडेवारी पाहिल्यास येत्या काही दिवसात इंधन दरात वाढ होऊ शकते. अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादल्यानं इंधन दरात मोठी वाढ होईल, अशी शक्यता होती. इराणशी व्यापारी संबंध कायम ठेवणाऱ्या देशांवर अमेरिका बहिष्कार टाकेल, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती. मात्र यामधून अमेरिकेनं भारत, चीन, जपानसह आठ देशांना वगळलं. याशिवाय अमेरिका, सौदी अरेबिया आणि रशियानं खनिज तेलाचं उत्पादन वाढवलं. त्यामुळे जवळपास वीस दिवस पेट्रोल, डिझेलचे दर घटले. एप्रिलनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी खनिज तेल 70 डॉलर प्रति बॅरलच्या खाली गेलं होतं. मात्र हा दिलासा फार काळ राहण्याची शक्यता कमीच आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या किमती सतत कमी होत आहेत. यामुळे तेल आयातदार देशांना दिलासा मिळाला आहे. मात्र यामुळे तेल निर्यातदार देशांच्या महसुलात घट झाली आहे. त्यामुळेच सौदी अरेबियाकडून खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा विचार सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्याच सौदीनं तेल उत्पादन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. तेलाचं उत्पादन कमी करण्याबद्दल चर्चा करण्यासाठी सौदी अरेबिया, इराक, इराण या ओपेक देशांची बैठक झाली आहे. या बैठकीला रशियाचा प्रतिनिधीदेखील उपस्थित होता. तेलाच्या किमती अशाच पद्धतीनं कमी होत राहिल्यास 2014-16 सारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती बैठकीत तेल निर्यातदार देशांनी व्यक्त केली.  

टॅग्स :खनिज तेलपेट्रोलडिझेल