Narayana Murthy : सध्या देशात कामाचे तास किती असावेत यावरुन वादविवाद सुरू असताना, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी मुंबई ते बेंगळुरू विमान प्रवासात मूर्तींबरोबरच्या भेटीचा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.
दोन तासांचा 'मास्टरक्लास'!तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी सांगितलं की, विमान प्रवासादरम्यान त्यांना नारायण मूर्तींबरोबर बोलण्याची संधी मिळाली, जो त्यांच्यासाठी "दोन तासांचा मास्टरक्लास" होता. सूर्या यांच्या मते, एआय (AI) पासून उत्पादनापर्यंत, शहरांच्या स्थितीपासून ते तरुणांच्या कौशल्य वाढीपर्यंत, नीतिमत्ता आणि नेतृत्वापर्यंत प्रत्येक विषयावर नारायण मूर्तींचे ज्ञान आणि स्पष्टता अविश्वसनीय आहे.
या संवादादरम्यान, सूर्या यांनी विनोदाने मूर्तींना सांगितलं की, ते त्यांचा आठवड्यातून ७० तास काम करण्याचा उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. (नारायण मूर्तींनी याआधी भारतीय तरुणांनी देशाच्या विकासासाठी आठवड्यातून ७० तास काम करावे, असं आवाहन केलं होतं, ज्यामुळे बरीच चर्चा झाली होती). यावर नारायण मूर्ती हसले आणि म्हणाले, "मी आठवड्यातून १०० तास काम करणारा एकमेव व्यक्ती ओळखतो, तो म्हणजे पंतप्रधान मोदी!"
७० तास कामाच्या वक्तव्यावर वाद, पण मोदींचे उदाहरण'तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे', या नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावरून यापूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. काही जणांनी याला देशासाठी कर्तव्य म्हणून पाठिंबा दिला होता, तर काहींनी हे अव्यवहार्य आणि कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक असल्याचं म्हटलं होतं.
वाचा - गुंतवणुकीत जोखीम नकोय? 'या' बँका FD वर देतायत ९% पर्यंत व्याजदर, फक्त ५ हजार गुंतवून व्हा मालामाल!
आता या चर्चेत पंतप्रधान मोदींचा उल्लेख आल्याने पुन्हा एकदा कामाच्या तासांवरील वाद वाढण्याची शक्यता आहे. तेजस्वी सूर्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.