Join us

पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार? भारताला दिलासा देण्यास अमेरिकेचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:32 IST

इराणसोबतचा व्यापार थांबवावा लागल्यानं भारताला फटका

नवी दिल्ली: इराणकडून खनिज तेलाची खरेदी थांबवल्यानंतर अमेरिकेकडून दिलासा मिळेल अशी भारताला आशा होती. मात्र अमेरिकेनं हात वर केल्यामुळे इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इराणसोबतचा तेल व्यापार थांबवल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई म्हणून अमेरिकेनं कमी दरानं खनिज तेलाची विक्री करावी, अशी विनंती भारताकडून करण्यात आली होती. मात्र अमेरिकेनं याबद्दल कोणतंही ठोस आश्वासन देण्यास नकार दिला. अमेरिकेतील खनिज तेलाचं क्षेत्र खासगी कंपन्यांकडे आहे. त्यामुळे आम्ही त्यांना स्वस्तात खनिज तेलाची विक्री करा, अशा सूचना देऊ शकत नाही, असं अमेरिकेचे व्यापार मंत्री विल्बर रॉस यांनी सांगितलं. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर बहिष्कार घालण्याची धमकी अमेरिकेनं सर्व देशांना दिली. मात्र इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतासह काही देशांना अमेरिकेनं सहा महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत नुकतीच संपली. त्यामुळे आता भारताला इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. इराणसोबतचा तेल व्यापार भारतासाठी फायदेशीर होता. इराणकडून तेल खरेदी करण्यात आल्यानंतर त्याचं बिल चुकतं करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली जायची. मात्र सौदी अरेबिया, कुवेत, इराक, नायजेरिया, अमेरिका यांच्याकडून अशी सवलत दिली जात नाही. इराणकडून होणारा तेल व्यापार बंद झाल्यानं बाजारात तेलाची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सौदी अरेबियासोबतच अन्य तेल पुरवठादार देशांशी चर्चा सुरू असल्याचं अमेरिकेनं सांगितलं आहे. बाजारातील तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, असंदेखील अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :पेट्रोल पंपडिझेलपेट्रोलअमेरिकाइराणसौदी अरेबिया