Indian Oil Petrol Diesel News: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ८ मे रोजी संध्याकाळपासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर लोक जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणीबाणीच्या काळात लागू शकतं म्हणून एलपीजी (LPG), पेट्रोल-डिझेल, अन्न, पेय, औषधं यासह जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याची ही अफवादेखील पसरत आहे. दरम्यान, इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं घाबरून जाण्याचं कारण नसून देशभरात आपल्याकडे पुरेसा इंधन साठा असल्याचं म्हटलंय.
"इंडियन ऑईलकडे संपूर्ण देशात पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. आमची पुरवठा साखळी योग्यरित्या सुरू आहे. इंधन आणि एलपीजी आमच्या सर्व आऊटलेट्सवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही," असं स्पष्टीकरण इंडियन ऑईलकडून देण्यात आलंय.
भारताचं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
पाकिस्ताननं गुरुवारी रात्री आठ वाजता भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडलं. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. जमिनीसोबतच भारत सरकार आणि लष्कर राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवरही पाकिस्तानला घेरत आहे. आज वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) महत्त्वाची बैठक होणार असून त्यात भारत या शेजारी देशाला आर्थिक पॅकेज देण्यास विरोध करणार आहे. पाकिस्तानसाठीच्या बेलआऊट पॅकेजबाबत भारत आयएमएफला आपलं मत कळवू शकतो, असं भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं.