Join us  

मोदींचं तेल उत्पादकांना साकडं, रुपयाला आधार देण्यासाठी हवी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 6:55 PM

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी तेल उत्पादकांना आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुपयाच्या होत असलेल्या अवमुल्यनामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे पडता रुपया सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तेल उत्पादकांना तेलाची रक्कम भरणा करण्याविषयीच्या अटींची समीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. आज दिल्लीत झालेल्या तेल उत्पादक देशांचे तेलमंत्री आणि आणि तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत झालेल्या  बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना हे आवाहन केले.  याबाबत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार " देशातील चलनाला अस्थायी दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल उत्पादकांना तेलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी असलेल्या अटींची समीक्षा करण्याचे आवाहन केले आहे."  भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयाक करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारताला आपल्या गरजेपैकी सुमारे 80 टक्के तेलाची आयात करावी लागते. सध्या तेलाची वाढती किंमत आणि रुपयाच्या  होत असलेल्या अवमूल्यनामुळे भारताच्या तिजोरीवर दबाव वाढत आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य बाजारांप्रमाणेच तेल बाजारामध्येही उत्पादक आणि ग्राहकांमध्ये मजबूत भागीदारी असली पाहिजे, असे सांगितले. तसेच गेल्या काही काळात तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्यामुळे भारतासारख्या सर्वात मोठ्या तेल ग्राहक देशाची चिंता वाढली आहे, असे मोदींनी सांगितले.  

टॅग्स :नरेंद्र मोदीखनिज तेलभारतअर्थव्यवस्था