नवी दिल्ली - केंद्र सरकारने गुड्स अँन्ड सर्व्हिसेस टॅक्स(GST)मध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यात ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असावेत अशी शिफारस आहे तर तंबाखू, पान मसालासारख्या आरोग्याशी निगडित जोखीम असणाऱ्या वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेत येणार आहे. जीएसटी स्लॅबमध्ये होणाऱ्या बदलाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये २ दिवसीय बैठक होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून लोकांना संबोधित केले. त्यात दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये मोठे बदल होतील अशी घोषणा केली. ते म्हणाले की, या दिवाळीला मी मोठी भेट देणार आहे. मागील ८ वर्षात आम्ही जीएसटीसारखे अनेक बदल केले आहेत. त्यामुळे देशातील कर प्रणाली सोयीस्कर झाली आहे. आता याचा आढावा घेतला जाईल. आम्ही राज्यांसोबत चर्चा करत आहोत. आता आम्ही पुढील पिढीसाठी जीएसटीत सुधारणा लागू करणार आहोत असं त्यांनी म्हटलं.
GST प्रणालीत सध्या ४ स्लॅब
सूत्रांनुसार, सरकारकडून जीएसटी सुधारणेत कृषी उत्पादने, आरोग्य संबंधित गोष्टी, हस्तशिल्प, विमा यासारख्या करांमध्ये कपात करण्याचा समावेश आहे. त्यातून ग्राहक वाढतील आणि आर्थिक विकासाला गती मिळेल असं सरकारला वाटते. सध्या जीएसटी प्रणालीत ४ स्लॅब आहेत, त्यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे आहेत. १२ आणि १८ टक्के स्लॅबमध्ये बहुतांश वस्तू आणि सेवा कव्हर केल्या जातात. प्रस्तावित सुधारणांमध्ये १२ टक्के स्लॅब काढून टाकणे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वस्तू ५ टक्के आणि १८ टक्के स्लॅबमध्ये समायोजित करणे समाविष्ट आहे.
जीएसटीमधील सुधारणेनंतर लोकांना आवश्यक असणाऱ्या सेवांवरील टॅक्स कपात होतील. एमएसएमईचा लाभ होईल, रोजच्या वापरामधील वस्तू स्वस्त होतील त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल. या सुधारणेत हेल्थ आणि लाइफ इन्सुरन्ससारख्या आवश्यक सेवांवरील कर कपातीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दिवाळीपूर्वी देशात ही सुधारणा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.