केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडसाठी (RINL) ११,४४० कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली आहे. ही माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडला पुनरुज्जीवनासाठी ११,४४० कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे कंपनीचे कामकाज सुधारेल. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पात या कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. मी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि या पॅकेजसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो.
कंपनीवर मोठे कर्ज -महत्वाचे म्हणजे, ही कंपनी मोठ्या कर्जाखाली दबलेली आहे. या कंपनीवर सुमारे ३५००० कोटी रुपये एवढे कर्ज आहे. ही कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ७.५ दशलक्ष टन (MT) एकात्मिक स्टील प्लांट चालवते.
विशाखापट्टणम स्टिल प्लांट नावाने ओळख -आरआयएनएल विशाखापट्टणम स्टील प्लांट (Visakhapatnam Steel Plant) नावाने ओळखला जातो. ही कंपनी स्थापनेपासूनच भारताच्या स्टील प्रोडक्शनमध्ये महत्वाची भूमिका बजावते. अलिकडच्या काळात कंपनीला वाढत्या कर्जामुळे, ऑपरेशनल आणि जागतिक बाजारपेठेतील अडचणींमुळे आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे ३५,००० कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होणे अपेक्षा आहे. यात पगारदार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.