Google Case : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई नवीन अडचणीत सापडले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईतील एका न्यायालयाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अवमानाची नोटीस बजावली आहे. गुगलचा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या एका व्हिडिओवर न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
सुंदर पिचाई यांना का पाठवली नोटीस?वास्तविक, न्यायालयाने याआधी यूट्यूबला ध्यान फाउंडेशन आणि तिचे संस्थापक योगी अश्विनी यांना लक्ष्य करणारे कथित बदनामीकारक व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर यूट्यूबने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे सुंदर पिचाई यांना यांना ही नोटीस धाडण्यात आली आहे. गुगलच्या मालकीच्या YouTube विरुद्ध ध्यान फाउंडेशनने दाखल केलेल्या खटल्याची पुढील सुनावणी ३ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
सुंदर पिचाई यांच्याविरुद्ध अवमान कारवाई होणार?न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आणि यापूर्वीच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सुंदर पिचाई यांच्यावर अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तींनी केली आहे. प्रत्यक्षात व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश असतानाही 'पाखंडी बाबा की करतूत' नावाचा व्हिडिओ भारताबाहेर आताही दिसत आहे.
ध्यान फाउंडेशनने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने आक्षेपार्ह व्हिडिओ जाणूनबुजून काढला नाही. यामुळे स्वयंसेवी संस्था आणि तिचे संस्थापक यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात त्यांची संस्था प्राणी कल्याणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था आहे. गुगलने जाणीवपूर्वक ध्यान फाउंडेशन आणि योगी अश्विनी यांच्या निष्कलंक व्यक्तिरेखेला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आहे. यासाठी गुगल विलंबाची रणनीती अवलंबत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.