Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींना आता विदेशातही हाय ग्रेड 'Z प्लस' सुरक्षा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:00 IST

केंद्र सरकारने यापूर्वी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करुन ती सुरक्षा उच्चतम अशा झेड प्लस दर्जाची केली आहे

देशातील गर्भश्रीमंत आणि जगातील टॉप उद्योगपतींपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबीयांना भारतात झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र, आता अंबानी कुटुंबीयांना विदेशातही झेड प्लस सुरक्षा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, भारतासह विदेशातही आता मुकेश अंबानींच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात येईल. मात्र, यासाठी होणारा संपूर्ण खर्च हा मुकेश अंबानी यांच्याकडूनच करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

केंद्र सरकारने यापूर्वी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करुन ती सुरक्षा उच्चतम अशा झेड प्लस दर्जाची केली आहे. सरकारच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी अंबानी कुटुंबींयाच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. अंबानी यांना २०१३ मध्ये सीआरपीएफ कंमांडोंचं कवच असलेल्या झेड सिक्युरीटीच्या वापरास परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या सुरक्षेसाठी लागणार खर्च हा अंबानींकडूनच घेण्यात येणार होता. त्यानुसार, आता विदेशातही झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत असून त्याचाही खर्च अंबानींना स्वत: करावयाचा आहे. नीता अंबानी यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. 

अंबानी कुटुंबीयांस मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, तर भारतभर आणि जगात जिथे जिथे ते जातील, त्या सर्व ठिकाणी ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असेल, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे. दरम्यान, ब्लूमबर्ग इंडेक्सच्या ताज्या आकडेवाडीनुसार मुकेश अंबानी जगातील १० व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

टॅग्स :मुंबईमुकेश अंबानीसर्वोच्च न्यायालयव्यवसायरिलायन्स