Mukesh Ambani Networth : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून उद्योगपती इलॉन मस्क यांचे वारू चौफेर उधळत आहेत. त्यांच्या संपत्तीत अफाट वाढ झाली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्या आगमनानंतर भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदार सातत्याने पैसे काढून घेत आहेत. परिणामी गेल्या २ महिन्यापासून बाजार सातत्याने घसरत आहे. मात्र, आता पहिल्यांदाच खेळ पलटला आहे. मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील वाढीमुळे देशातील २ सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी एकाच दिवसात १.७० अब्ज डॉलर म्हणजेच १४,६०० कोटी रुपयांची वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ९२.२ अब्ज डॉलर्स झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत १.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७ व्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मंगळवारी बीएसईवर १.८६ टक्क्यांनी १२४०.९० रुपयांवर बंद झाले.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत १२,९०० कोटी रुपयांची वाढअंबानींसोबतच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही मंगळवारी लक्षणीय वाढ झाली. गौतम अदानी यांची संपत्ती एका दिवसात १.५० अब्ज डॉलर म्हणजेच १२,९०० कोटी रुपयांनी वाढली. यासह, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७६ अब्ज डॉलर्स झाली आहे. अदानीच्या एकूण संपत्तीत या वर्षात आतापर्यंत २.७० अब्ज डॉलरची घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो १९व्या स्थानावर आहे.
इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घसरणजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत मंगळवारी मोठी घसरण झाली. इलॉन मस्कच्या संपत्तीत मंगळवारी ११.८ अब्ज डॉलर म्हणजेच १,०१,२०० कोटी रुपयांची घट झाली. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती ४२६ अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत ६.७५ अब्ज डॉलर्सने घसरली आहे.