Join us
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 22:05 IST

या वृत्तानंतर, शेअर बाजारात सूचीबद्ध शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षी ३१ ऑक्टोबरल संपणाऱ्या २०२४-२५ या कालावधीसाठी, सी-ग्रेड मोलॅसिसपासून मिळवलेल्या इथेनॉलची किंमत (एक्स-मिल) १.६९ रुपयांनी वाढवून ५७.९७ रुपये लिटर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या वृत्तानंतर, शेअर बाजारात सूचीबद्ध शुगर स्टॉक्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर, ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार, बी श्रेणीतील हेवी मोलॅसेस आणि उसाचा रस/साखर/मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमती अनुक्रमे ६०.७३ रुपये प्रति लिटर आणि ६५.६१ रुपये प्रति लिटर कायम ठेवण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ साठी, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या इथेनॉल खरेदी किंमतीत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे  लक्ष्य देखील 2030 वरून 2025-26 केले आहे. या दिशेने पाऊल उचलत तेल विपणन कंपन्यांनी चालू इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ दरम्यान १८ टक्के मिश्रण साध्य करण्याची योजना आखली आहे.

शेअर्सची स्थिती -आज बुधवारी दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या शेअर संदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर 5.79% ने वाढून 355.10 रुपयांवर बंद जाला. बलरामपूर शुगर मिल्सचा शेअर 496.10 रुपयांवर आहे. हा शेअर आज 3.45% ने वधारला. श्री रेणुका शुगर्सचा शेअर 5.76% ने वाढून 37.85 रुपयांवर बंद झाला. याशिवय बजाज हिन्दुस्तान शुगर लिमिटेडचा शेअर 3.22% ने वाढून 27.26 रुपयांवर बंद झाला. बन्नारी अम्मन शुगर्सचा शेअर  6.32% ने वाढून 3629 रुपयांवर पोहोचला. तर धामपूर शुगर मिल्सचा शेअर 7.37% ने वाढून 152.95 रुपयांवर बंद झाला.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :नरेंद्र मोदीशेअर बाजारगुंतवणूकपेट्रोल