नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत छोट्या व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत तुम्हाला कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत तर मिळू शकतेच, शिवाय कर्जासाठी मुद्रासारख्या योजनांचाही लाभ घेता येतो. या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारनं क्रेडिट कार्ड सुरू करण्याची ही घोषणा केली आहे. त्यासाठी कोण अर्ज करू शकेल? चला जाणून घेऊया.
काय म्हणालेल्या अर्थमंत्री?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. 'उद्योग पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांसाठी पाच लाख रुपयांच्या मर्यादेसह कस्टमाइज्ड मायक्रो क्रेडिट कार्ड सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी १० लाख कार्ड देण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली होती.
नोंदणी कशी करावी?
त्यासाठी पहिले उद्यम पोर्टल msme.gov.in. भेट द्या. येथे आपल्याला Quick Links वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला Udyam Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावं लागेल. नोंदणी आणि पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहितीदेखील येथे मिळेल. त्यानुसार नोंदणी करता येईल. नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा आहे.
बजेटमध्ये 'या'ही घोषणा झालेल्या
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आलं आहे. यामुळे पाच वर्षांत दीड लाख कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज उपलब्ध होणार आहे. २७ प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १% कमी शुल्कासह, स्टार्टअप्ससाठी गॅरंटी कव्हर १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपयांपर्यंत दुप्पट केलं जाईल. याशिवाय, निर्यातदार एमएसएमईंना वाढीव गॅरंटी कव्हरसह २० कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत कर्जाचा फायदा होईल.