Join us

मास्टरकार्ड पुण्यात उभारणार प्रकल्प! पाच वर्षांत ७ हजार कोटींची होणार गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 04:51 IST

जगातील सर्वात मोठी क्रेडिट/डेबिट कार्ड कंपनी मास्टरकार्ड पुढील पाच वर्षांत भारतात एक अब्ज डॉलर्स (७,००० कोटी रुपये) गुंतविणार आहे, अशी माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली.

मुंबई : जगातील सर्वात मोठी क्रेडिट/डेबिट कार्ड कंपनी मास्टरकार्ड पुढील पाच वर्षांत भारतात एक अब्ज डॉलर्स (७,००० कोटी रुपये) गुंतविणार आहे, अशी माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली. या गुंतवणुकीतून पुण्यात मोठा प्रकल्प उभारण्यात येण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले.यापैकी ३५० दशलक्ष डॉलर्स (२,४५० कोटी रुपये) मास्टरकार्ड एका पेमेंट प्रोसेसिंग सेंटरमध्ये गुंतवणार आहे. मास्टरकार्डचे हे सेंटर अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठे पेमेंट प्रोसेसिंग सेंटर राहणार असून, त्याद्वारे १,००० व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. हे सेंटर बहुधा पुण्यात सुरू केले जाईल, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.या सेंटरमधून एटीएम कार्ड, प्रीपेड कार्ड व पॉइंट आॅफ सेल (कार्ड स्वॅपिंग) मशिन्सचे सर्व व्यवहार क्षणार्धात स्वीकारले जातील. याचबरोबर मास्टरकार्डच्या या सेंटरमध्ये एटीएम कार्डासंबंधी गुन्हे उघडकीस आणणारी सक्षम यंत्रणा कार्यरत असेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.भारतात कंपनीचे २ हजार कर्मचारीमास्टरकार्डचे पेमेंट प्रोसेसिंग सेंटर पुढील वर्षापर्यंत तयार होईल व त्यानंतर व्यवसाय वाढविण्यासाठी मास्टरकार्ड उरलेली ४,६०० कोटींची गुंतवणूक २०२४ पूर्वी करील.२०१४ साली मास्टरकार्डचे भारतात फक्त ३० कर्मचारी होते. मास्टरकार्डने गेल्या पाच वर्षांत ६,५०० कोटीची गुंतवणूक भारतात केली असून, आज मास्टरकार्डकडे २,००० कर्मचारी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मास्टरकार्ड ही जगातील सर्वांत मोठी डेबिट व क्रेडिट कार्ड बनविणारी कंपनी आहे.

टॅग्स :व्यवसायभारत