Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता आयटी क्षेत्रात 'गॅस' संकट; LPG च्या तुटवड्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलं 'वर्क फ्रॉम होम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:59 IST

Gas Shortage : कोरोना महामारीत लॉकडाउन लागल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता चक्क गॅस टंचाईमुळे वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

Gas Shortage : सध्या देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली असून याचा फटका उद्योगधंद्यापासून सर्वसामान्यांपर्यंत बसत आहे. गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' दिल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, आता चक्क स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आयटी क्षेत्रातील कामाच्या स्वरूपावर परिणाम करू लागला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा फटका भारताच्या व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याला बसला असून, यामुळे चेन्नईतील दिग्गज आयटी कंपनी HCLTech ने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस घरून काम करण्यास सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईतील एचसीएल टेकच्या कॅम्पसमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. कॅन्टीन चालवण्यासाठी आवश्यक इंधन उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांच्या भोजनाची सोय करणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून कंपनीने गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा बदल केवळ चेन्नई केंद्रापुरता मर्यादित असून देशातील इतर कार्यालयांचे कामकाज नियमित सुरू आहे.

इतर बड्या कंपन्यांनाही झळ

एलपीजीच्या या टंचाईचा परिणाम केवळ एचसीएल पुरता मर्यादित नाही. देशातील इतर नामांकित कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे.

  • इन्फोसिस : बेंगळुरू, पुणे आणि चेन्नई येथील डिलिव्हरी सेंटर्सवर फूड कोर्टच्या सेवा मर्यादित केल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत 'लाईव्ह काउंटर' बंद ठेवण्यात आले आहेत.
  • HTC ग्लोबल सर्व्हिसेस : चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादमधील कार्यालयातील कॅन्टीन पूर्णपणे बंद करून कर्मचाऱ्यांना केवळ 'पॅक्ड स्नॅक्स'वर अवलंबून राहावे लागत आहे.
  • TCS : दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कॅम्पसमध्ये अद्याप कामकाज आणि कॅन्टीन सेवा सुरळीत असल्याचे समजते.

थाळीतून पदार्थ गायब; मेनूमध्ये मोठे बदल

कॉर्पोरेट कॅन्टीन चालवणाऱ्या 'हंगरबॉक्स' या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गॅसची बचत करण्यासाठी जेवणाच्या मेनूमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

  1. ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो, ते मेनूमधून हटवण्यात आले आहेत.
  2. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणांचा वापर करत आहेत.
  3. कर्मचाऱ्यांसाठी आता 'क्यूरेटेड कॉम्बो मील' आणि आधीच तयार असलेल्या 'रेडी-टू-सर्व्ह' जेवणावर भर दिला जात आहे.

वाचा - फक्त एकाच मार्गामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते का? कोण-कोणत्या आहेत हार्मुजसारख्या 'लाईफलाईन्स'

थोडक्यात सांगायचे तर...जागतिक घडामोडींचा परिणाम आता थेट मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या ताटावर आणि ऑफिसच्या कामकाजावर होऊ लागला आहे. जर एलपीजीचा पुरवठा लवकर पूर्ववत झाला नाही, तर येत्या काळात इतर क्षेत्रांतील कार्यालयांनाही अशाच प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : IT sector hit by gas crisis; work from home given.

Web Summary : LPG shortage impacts IT firms. HCLTech Chennai offers 'work from home'. Other companies limit canteen services due to gas scarcity.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईअमेरिका-इस्रायल-इराण वॉरमाहिती तंत्रज्ञान