World's Richest Person : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर टेस्लाचे मालक इलॉन मस्क अडचणीत आले आहेत. त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. आता तर त्यांचं सर्वोच्च स्थान देखील गेलं आहे. अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ऑरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना मागे टाकून ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ऑरेकल कॉर्पोरेशनने अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर आणि भविष्यात अधिक वाढीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर, बुधवारी सकाळी न्यूयॉर्कमध्ये लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत १०१ अब्ज डॉलरची वाढ झाली.
लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती किती?ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ऑरेकलच्या शेअर्समधील या विक्रमी वाढीमुळे लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती ३९३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८५ अब्ज डॉलर आहे. ही एका दिवसात निर्देशांकात नोंदवली गेलेली आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्क २०२१ मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, परंतु नंतर त्यांना जेफ बेजोस आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांनी मागे टाकले. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आणि ३०० हून अधिक दिवस ते या स्थानावर कायम होते.
ऑरेकलच्या शेअर्समध्ये ४१% ची विक्रमी वाढ८१ वर्षीय लॅरी एलिसन, ज्यांनी ऑरेकलची सह-स्थापना केली आणि सध्या ते कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ऑरेकलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. कंपनीने त्यांच्या क्लाउड पायाभूत सुविधा व्यवसायासाठी एक आक्रमक दृष्टीकोन जाहीर केल्यानंतर आणि जोरदार बुकिंग नोंदवल्यानंतर बुधवारी शेअर्समध्ये ४१% ची विक्रमी वाढ झाली. ही कंपनीच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे. या वर्षात मंगळवारच्या बंद भावापर्यंत ऑरेकलचे शेअर्स आधीच ४५% वाढले होते.
वाचा - पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
दुसरीकडे, टेस्लाच्या शेअर्सच्या भावात या वर्षात सुमारे १३% घट झाली आहे. मस्क यांनी अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये पूर्ण केली तर कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना १ ट्रिलियन डॉलरचे एक मोठे वेतन पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जर हे झाले तर ते जगातील पहिले 'खरबपती' बनू शकतात.