Join us

TCS ला कामगार मंत्रालयाचा दणका! १२,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीवर नोटीस, पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:51 IST

TCS Layoffs : आयटी कंपनी टीसीएसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कंपनीने अलीकडेच १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखल्याची घोषणा केली. यानंतर, कामगार मंत्रालयाने कंपनीला नोटीस पाठवली आहे.

TCS Layoffs : भारतातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती, जी त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे २ टक्के आहे. आता यावरून कामगार मंत्रालयाने टीसीएसला नोटीस पाठवली आहे. मंत्रालयाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

कामगार संघटनेची तक्रार, मंत्रालयाची दखलमीडिया रिपोर्ट्सनुसार, आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटना 'नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने मुख्य कामगार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याच तक्रारीनंतर कामगार मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. सूत्रांनुसार, आयटी मंत्रालय देखील या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि टीसीएसच्या संपर्कात आहे.

नोटीसमध्ये नमूद केलेले मुख्य मुद्देसीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, कामगार मंत्रालयाने दोन प्रमुख मुद्द्यांवर टीसीएसला समन्स बजावले आहे.

  1. कर्मचारी कपात: कंपनी तिच्या २% कर्मचाऱ्यांना, म्हणजेच १२००० कर्मचाऱ्यांना, का कमी करत आहे?
  2. भरती थांबवणे: कंपनीने ६००० व्यावसायिकांची भरती का थांबवली, ज्यांना कंपनीने ऑफर लेटर दिले होते पण त्यांना सामील होण्याची परवानगी दिली नव्हती?

या दोन्ही प्रकरणांमध्ये मंत्रालयाने सविस्तर उत्तर मागितले आहे. NITES च्या तक्रारीवर कारवाई करत मुख्य कामगार आयुक्तांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

टीसीएसचा निर्णय अमानवी आणि बेकायदेशीर : संघटना२८ जुलै रोजी टीसीएसने केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेवर NITES ने जोरदार टीका केली आहे. NITES ने या निर्णयाला 'अमानवी, अनैतिक आणि पूर्णपणे बेकायदेशीर' म्हटले आहे.

NITES ने इशारा दिला आहे की, जर टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीला योग्य प्रक्रियेशिवाय कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याची परवानगी दिली गेली, तर ते संपूर्ण उद्योगासाठी धोकादायक उदाहरण निर्माण करेल. NITES ने सरकारला या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे, टीसीएसला नोटीस बजावून सर्व प्रकारच्या नोकऱ्या थांबवाव्यात अशी मागणी केली आहे.

वाचा - जुलैमध्ये सोने २,५०० रुपयांनी महागले; आता थेट १ लाख पार करणार? तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार, वाचा!

NITES ने असेही म्हटले आहे की, टीसीएसच्या या निर्णयाचा परिणाम बहुतेक मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील व्यावसायिकांवर होईल. हे असे लोक आहेत ज्यांनी २० वर्षांपासून कंपनीची निष्ठेने सेवा केली आहे. टीसीएसने कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना न देता आणि सरकारला माहिती न देता हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याची तयारी केली असल्याचा आरोपही NITES ने केला आहे. या घडामोडींमुळे आता टीसीएसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :टाटामाहिती तंत्रज्ञानकर्मचारी