Kolhapuri Chappal : इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडावर कोल्हापुरी चप्पलचा गैरवापर केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच झाला होता. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटलाही दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच प्राडाचे काही अधिकारी कोल्हापुरात येऊन या चप्पल निर्मितीची माहिती घेऊन गेले. या सर्व घडामोडींनंतर कोल्हापुरी चपलेला एक नवीन ओळख मिळाली आहे. आता कोल्हापुरी चप्पल QR कोडच्या स्वरूपात बाजारात दिसणार आहे.
बनावट चप्पलला आळा घालण्यासाठी QR कोडमहाराष्ट्राच्या लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने बनावट कोल्हापुरी चप्पलची विक्री रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रत्येक कोल्हापुरी चप्पलच्या जोडीला आता QR-कोड केलेले प्रमाणपत्र असेल. हा डिजिटल उपक्रम बनावटीला आळा घालण्यासोबतच, प्रत्येक उत्पादनामागील कारागीर किंवा स्वयं-मदत गटाची ओळख उघड करेल. ग्राहक हा कोड स्कॅन करून, कारागीर किंवा उत्पादन युनिटचे नाव, महाराष्ट्रातील उत्पादन जिल्हा, हस्तकला तंत्र, वापरलेला कच्चा माल आणि भौगोलिक निर्देशक (GI) प्रमाणपत्राची वैधता यासारखी माहिती मिळवू शकतील. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि पारंपारिक कारागिरांना बाजारात योग्य स्थान मिळेल.
प्राडा वाद आणि त्यानंतरची घडामोडअलीकडेच, इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नवीन कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलसारखे दिसणारे पादत्राणे समाविष्ट केल्याबद्दल कारागिरांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यांनी प्राडावर जीआय अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. या वादानंतर, प्राडाने कबूल केले की त्यांच्या २०२६ च्या पुरुषांच्या फॅशन शोमध्ये दाखवलेले सँडल पारंपारिक भारतीय हस्तकला पादत्राणांपासून प्रेरित होते. प्राडाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, हे सँडल डिझाइनच्या टप्प्यात आहेत आणि त्यांचे व्यावसायिक उत्पादन अजून निश्चित झालेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला प्राडाच्या तज्ज्ञांच्या पथकाने कारागिरांशी संवाद साधण्यासाठी आणि स्थानिक पादत्राणे उत्पादन प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी कोल्हापूरला भेट दिली.
कोल्हापुरी चप्पलचा गौरवशाली इतिहासकोल्हापुरी चप्पलचा इतिहास १२ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. ही चप्पल प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात बनवली जाते. नैसर्गिकरित्या टॅन केलेल्या चामड्यापासून आणि हाताने विणलेल्या पट्ट्यांपासून बनवलेली, तिची विशिष्ट रचना पिढ्यानपिढ्या कारागिरांनी जपली आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दूरदर्शी शासक छत्रपती शाहू महाराजांनी याला स्वावलंबन आणि स्वदेशी अभिमानाचे प्रतीक म्हणून प्रोत्साहन दिले, ज्यामुळे ही ग्रामीण हस्तकला एक प्रतिष्ठित कुटीर उद्योगात विकसित झाली. या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आणि कारागिरांना योग्य मान्यता मिळावी यासाठी, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने २०१९ मध्ये संयुक्तपणे याला जीआय दर्जा मिळवून दिला.
वाचा - संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
या सर्व घडामोडींमुळे कोल्हापुरी चप्पलला एक नवी ओळख मिळाली आहे आणि आता ती अधिक सुरक्षित आणि प्रामाणिकतेने आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.