Join us

मुकेश अंबानी यांच्या 'या' कंपनीत होणार नोकर कपात? किती मिळणार नुकसान भरपाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:19 IST

JioStar To Lay Off : आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुकेश अंबानींची कंपनी जिओ स्टारने टाळेबंदी सुरू केली आहे. कंपनी ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे.

JioStar To Lay Off : नाराणय मूर्ती सह संस्थापक असलेल्या इन्फोसिसमध्ये नुकतेच ३००० पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावरुन काढून टाकले होते. याआधी फेसबुक, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला या दिग्गज कंपन्यांनीही नोकर कपातीची घोषणा केली आहे. यामध्ये आता आणखी एकाची भर पडणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओस्टारही टाळेबंदीच्या तयारीत आहे. जिओस्टार १,१०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वायकॉम १८ आणि वॉल्ट डिस्ने कंपनी मर्ज झाल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, जिओस्टार १,१०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

जिओस्टार का करतंय टाळेबंदी?वायकॉम १८ आणि डिस्ने स्टार इंडिया यांचे विलीनीकरण झाले आहे. जिओस्टार आता देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनली आहे. अहवालानुसार, ऑपरेशन मजबूत करणे आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही टाळेबंदी केली जात आहे. कंपनी हायग्रोथ क्षेत्रांना, विशेषतः क्रीडा आणि डिजिटल स्ट्रीमिंगला प्राधान्य देत आहे. जिओस्टार नवीन चॅनेल लॉन्च करण्याच्या योजनांसह स्पोर्ट्स पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणाने भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी तयार झाली असून ज्याचे मूल्य ७०,३५२ कोटी रुपये आहे.

कोणाच्या नोकऱ्या जाणार?प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा हवाला देऊन, सुमारे डझनभर लोकांनी माहिती दिली की वितरण, वित्त, व्यावसायिक आणि कायदेशीर यासह विविध कॉर्पोरेट विभागातील कर्मचाऱ्यांना या नोकर कपातीचा फटका बसू शकतो. यामध्ये प्राथमिक स्तरापासून वरिष्ठ व्यवस्थापक, संचालक आणि अगदी सहाय्यक उपाध्यक्षांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

आयपीएलनंतर स्पोर्ट्स विभागती नोकर कपात?सध्यातरी क्रीडा विभागाला हात लावला नाही. याचे कारण म्हणजे सुरू असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी, महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एकामागून एक होणार आहेत. मात्र, या मोठ्या स्पर्धा संपल्यानंतर या विभागातही नोकर कपात होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई?मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकसान भरपाई पॅकेज कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीनुसार बदलते, जे ६ ते १२ महिन्यांच्या पगाराच्या दरम्यान असते. कर्मचाऱ्यांना एक ते तीन महिन्यांच्या नोटिस कालावधीशिवाय कंपनीमध्ये पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचा पगार मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत ६ वर्षांपेक्षा कमी काळ काम केले आहे, त्यांना नोटीस कालावधीच्या वेतनासह किमान ७ महिन्यांचे पगार देणार आहेत. दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५ महिन्यांपर्यंत भरपाई मिळू शकते. याव्यतिरिक्त, काही प्रभावित कर्मचाऱ्यांना-विशेषतः तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांमध्ये-जिओ किंवा रिलायन्स समुहातील कंपन्यांमध्ये नोकरी देऊ शकतात.

टॅग्स :मुकेश अंबानीजिओरिलायन्स जिओरिलायन्स