Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jio Financial चं मार्केट कॅप पहिल्यांदाच ₹२ लाख कोटींपार, रिलायन्सचे शेअर्सही नव्या विक्रमी उंचीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:25 IST

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचं ​​बाजार भांडवल 23 फेब्रुवारी रोजी प्रथमच 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचं  (Jio Financial Services Ltd) ​​बाजार भांडवल (Market Cap) शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी प्रथमच 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनंही आज 23 फेब्रुवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला. दरम्यान, सकाळी 10.30 वाजता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स 8 टक्क्यांनी वाढून 326 रुपयांच्या विक्रमी पातळीवर व्यवहार करत होते. सलग पाचव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 17 टक्क्यांनी वाढून 2.08 लाख कोटी रुपये झालंय. 

तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं इंट्राडेमध्ये 2,989 रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकी स्तराला स्पर्श केला. बीएसईवर, मागील बंदच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी वाढून शेअर 2,978 रुपयांवर व्यवहार करत होता. 

सध्या 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या 39 कंपन्या शेअर बाजारात व्यवहार करत आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज 20.05 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह सर्वात मोठी कंपनी आहे. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक अनुक्रमे 14.78 लाख कोटी आणि 10.78 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. 

तिमाहीची स्थिती काय? 

जिओ फायनान्शिअलनं डिसेंबरच्या तिमाहीत 293 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 269 कोटी रुपयांचे निव्वळ व्याज उत्पन्न नोंदवलं आहे. या तिमाहीत त्यांचं एकूण व्याज उत्पन्न 414 कोटी रुपये होते आणि एकूण महसूल 413 कोटी रुपये होता. 

जिओ फायनान्शिअल सुरक्षित कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि सध्याच्या बाजार आणि नियामक वातावरणात असुरक्षित कर्जासाठी सावध दृष्टीकोन घेतला आहे. दोन नवीन उत्पादनं लाँच करून सुरक्षित कर्ज व्यवसायाला चालना देण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. जानेवारीमध्ये, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंटनं भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रं दाखल केली होती. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सजिओशेअर बाजारशेअर बाजार