Join us

Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:34 IST

Infosys Share Crash: डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यानंतर नारायण मूर्ती कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय.

Infosys Share Crash: डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई निर्देशांकात इन्फोसिसचा शेअर जवळपास ६ टक्क्यांनी घसरून १,८१२.७० रुपयांवर आला. नंतर हा शेअर ५.७७ टक्क्यांनी घसरून १८१५.१० रुपयांवर बंद झाला. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रवर्तक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या कुटुंबाचं या घसरणीमुळे १९०० कोटी रुपयांचं मोठं नुकसान झालंय.

कोणाचा किती हिस्सा?

इन्फोसिसमध्ये मूर्ती कुटुंबाचा एकूण ४.०२% हिस्सा आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रवर्तक एन. आर. नारायण मूर्ती यांची सप्टेंबर तिमाहीत कंपनीत ०.४० टक्के हिस्सा होता. त्यात त्यांच्या पत्नी सुधा एन. मूर्ती यांचा ०.९२ टक्के हिस्सा आहे. याशिवाय मुलगा रोहन मूर्ती यांचा १.६२ टक्के आणि मुलगी अक्षता मूर्ती (ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी) यांचा १.०४ टक्के हिस्सा आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंत नारायण मूर्ती यांचा नातू एकग्र रोहन मूर्ती याचा इन्फोसिसमध्ये केवळ ०.०४ टक्के हिस्सा आहे. मूर्ती कुटुंबातील पाच सदस्यांचा मिळून इन्फोसिसमध्ये ४.०२% हिस्सा आहे, ज्याचं मूल्य शुक्रवारच्या घसरणीनंतर ३०,३३४ कोटी रुपये झालं.

काय आहेत निकाल?

इन्फोसिस लिमिटेडचा एकूण निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ११.४ टक्क्यांनी वाढून ६,८०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत कंपनीला ६८०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. २०२३-२४ च्या याच तिमाहीत कंपनीला ६१०६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४.६ टक्क्यांनी वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला होता.

या कालावधीत कंपनीचं एकूण उत्पन्न ७.६ टक्क्यांनी वाढून ३८८२१ कोटी रुपयांवरुन वाढून ४१७६४ कोटी रुपये झालं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न केवळ १.९ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपये झालं होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :नारायण मूर्तीइन्फोसिसशेअर बाजार