Infosys Layoffs : फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटाने नुकतेच ३६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. ही घटना ताजी असताना आता भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या ३०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या वर्षी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला होता. अशात या निर्णयाने कंपनीवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.
इन्फोसिसने आपल्या म्हैसूर कॅम्पसमधून ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. हे कर्मचारी कंपनीच्या अंतर्गत मूल्यांकनात वारंवार नापास झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, काढून टाकलेल्या या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी कॅम्पस सोडण्यास सांगण्यात आले. रात्रभर थांबण्याची त्यांची विनंतीही कंपनीने फेटाळून लावली. कंपनीतून काढून टाकलेल्या एका प्रशिक्षणार्थीने सांगितले की, त्याच्या एका महिला सहकाऱ्याने कॅम्पसमध्ये रात्रभर थांबण्याची विनंती केली होती. परंतु, कंपनीने नकार दिला.
वृत्तानुसार, नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेल्या ट्रेनी महिले कंपनी व्यवस्थापनाला रात्री थांबण्याची विनंती केली होती. 'कृपया मला रात्री राहू द्या.' मी उद्या जाईन. आता मी कुठे जाऊ?' पण, तुम्ही कंपनीचा भाग नसल्याने थांबू शकत नाही, हे कारण देत थांबण्यास नकार दिला. संबंधित महिलेला सायंकाळी ६ पर्यंत कॅम्पस सोडण्याचा आदेश दिला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, काढून टाकलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी म्हैसूर कॅम्पसमध्ये प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. परंतु, तीन प्रयत्न करूनही ते अंतर्गत मूल्यांकनात उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. कर्मचाऱ्यांना कंपनीत कायम राहण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे कंपनीने सांगितले.
इन्फोसिस कंपनीकडून स्पष्टीकरणइन्फोसिस कंपनीने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने सांगितले की, 'इन्फोसिसमधील भरती प्रक्रिया अतिशय कडक आहे. सर्व कर्मचाऱ्यांना भरती झाल्यानंतर आमच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर अंतर्गत मूल्यांकन उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकाला ३ संधी दिल्या जातात. मात्र, यात नापास झाल्यास त्यांना कंपनीत ठेवले जाणार नाही. ही अट करारात देखील लिहिलेली आहे. बऱ्याच ट्रेनी कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर मिळाल्यानंतर इन्फोसिसमध्ये जॉईन करण्यासाठी २ वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. मात्र नोकरी सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच त्यांना काढून टाकण्यात आले.
युनियनचा कारवाई करण्याचा इशारा
इन्फोसिसमधून काढून टाकलेल्या ट्रेनी कर्मचाऱ्यांची संख्या नोंदवलेल्या संख्येपेक्षा खूप जास्त असल्याचा दावा IT कर्मचारी युनियन एनआयटीईएसने केला आहे. या प्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी एनआयटीईएसने केली आहे.