Salary Hike : काही दिवसांपूर्वी आघाडीची टेक कंपनी इन्फोसिसने आपल्या म्हैसूर कॅम्पसमधील ३००० हून अधिक फ्रेशर्नला कामावरुन काढले होते. याविरोधात आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आवाज उठवल्याने थेट केंद्राला यात हस्तक्षेप घ्यावा लागला. आता इन्फोसिससोबत आघाडीची आयटी कंपनी टीसीएस देखील कर्मचाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. देशातील आयटी क्षेत्र पुन्हा एकदा दबावाखाली असल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसून येणार आहे. यापूर्वी कोविड-१९ च्या काळातही आयटी क्षेत्रावर दबाव होता. आता जागतिक अनिश्चिततेमुशे तशीच परिस्थिती निर्माण होत आहे.
भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी TCS या वर्षी ४ ते ८ टक्के पगारवाढ देणार आहे, तर देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी इन्फोसिस देखील ५ ते ८ टक्के पगारवाढ देणार आहे. या दोन कंपन्यांमध्ये लाखो कर्मचारी काम करतात. ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच वाईट आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ साठी कमी तिमाही व्हेरिएबल वेतन देखील जाहीर करेल. मनीकंट्रोलनुसार, कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना १०० टक्के व्हेरिएबल वेतन मिळेल, तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना २० ते ४० टक्के व्हेरिएबल वेतन मिळू शकते. याचा अर्थ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसमध्ये मोठी कपात करण्याची तयारी कंपनीने केली आहे.
टीसीएस कंपनीचा ४ वर्षात पहिल्यांदाच निर्णयनवीन आर्थिक वर्षात टीसीएस कर्मचाऱ्यांची पगारवाढ गेल्या ४ आर्थिक वर्षांतील सर्वात कमी आहे. टीसीएसने FY22 मध्ये १०.५ टक्के, FY23 मध्ये ६-९ टक्के आणि FY24 मध्ये ७-९ टक्के पगार वाढवला होता. डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५,३७० ने कमी करून ६,०७,३५४ केली असताना यावर्षीची कमी पगारवाढ होत आहे. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर देखील तिमाही FY24 मध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढला, जो एका वर्षापूर्वी १२.३ टक्के होता.
कंपन्यांच्या नफ्यात मात्र वाढ टीसीएस कंपनी पगारवाढीबाबत हात आखडता घेत असला तरी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, तिचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५.५ टक्क्यांनी वाढून १२,३८० कोटी रुपये झाला आहे. जो तज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कंपनीचा महसूलही ५.६ टक्क्यांनी वाढून ६३,९७३ कोटी रुपये झाला आहे. इन्फोसिसमध्येही ३.२३ लाख कर्मचारी आहेत, ज्यांना यावर्षी ६ ते ८ टक्के पगारवाढीचा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ११.४ टक्क्यांनी वाढून ६,८०६ कोटी रुपये झाला आहे.