Join us

इंडिगोची ऑफर भारी, 1212 रुपयांत करा विदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:50 IST

इंडिगोकडून केवळ 1212 रुपयांत तुम्हाला विमानप्रवासाची ऑफर देण्यात आली आहे. आजपासून या तिकीटांचे बुकींग सुरु असून...

नवी दिल्ली - स्वस्तात विमानसेवा उपलब्ध करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्स कंपनीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी खास ऑफर सुरु केली आहे. त्यानुसार, केवळ 1212 रुपयांत तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. आजपासून या तिकीटांचे बुकींग सुरु असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला प्रवास करता येणार आहे. 10 जुलै ते 13 जुलैपर्यंतच ही बुकींगसुविधा उपलब्ध असणार आहे. 

इंडिगोकडून 12 व्या वर्धापन दिनानिमित्त एका योजनेअंतर्गत तब्बल 12 लाख सीट्स बुकींग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या 6 ई नेटवर्कवरुन ही ऑफर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या योजनेत आंतरराष्ट्रीय प्रवासाचाही समावेश आहे. इंडिगोचे प्रमुख अधिकारी विल्यम बोल्टर यांनी याबाबत म्हटले की, भारतीय एअरलाईन्सच्या सीट्सची सर्वात मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. 4 ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस संस्मरणीय ठेवण्यासाठी आम्ही ही घोषणा केली. देशातील 57 शहरांतील नेटवर्कद्वारे हे 12 लाख सीट्सचे बुकींग होणार आहे. दरम्यान, या बुकींगसाठी कमीत-कमी 3000 रुपयांचे तिकीट खरेदी केल्यास आणि भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास प्रवाशांना 5 टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.

टॅग्स :इंडिगोविमानभारत