भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो बुधवारी अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सला मागे टाकत, बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मौल्यवान विमान कंपनी बनली आहे. बुधवारी इंडिगोच्या शेअरची किंमत ₹५,२६२.५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास एअरलाइनचे मार्केट कॅप २३.२४ अब्ज डॉलरवर पोहोचले होते. जे डेल्टाच्या २३.१७ अब्ज डॉलर बाजार भांडवलापेक्षा अधिक आहे.जगातील टॉप १० एअरलाइन्समध्ये इंडिगो ही एकमेव भारतीय विमान कंपनी आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियमच्या आकडेवारीनुसार, इंडिगो दर आठवड्याला १५,७६८ उड्डाणे चालवते. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२.७ टक्के अधिक आहे. देशाच्या हवाई प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतीय विमान कंपन्यांनी २०२३ पासून अनेक महत्त्वपूर्ण विमान ऑर्डर दिल्या आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये, टाटा-संचालित एअर इंडिया समूहाने ४७० विमाने (२५० एअरबस आणि २२० बोईंग) ऑर्डर दिली. जून २०२३ मध्ये, इंडिगोने एअरबसकडून ५०० नॅरो बॉडी A320neo फॅमिली विमानांसाठी एका डीलवर स्वाक्षरी करून जगातील सर्वात मोठी विमान ऑर्डर दिली. जानेवारी २०२४ मध्ये, नवीन एअरलाइन अकासा एअरने बोईंगला १५० B७३७ MAX विमानांची ऑर्डर दिली.
तीन महिन्यांनंतर, इंडिगोने वाइड-बॉडी विमानांसाठी आपली पहिली ऑर्डर दिली होती. हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स आणि नेटवर्कचा विस्ताराच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये, एअर इंडियाने एअरबसला आणखी ८५ विमानांची ऑर्डर दिली. एअर इंडिया ग्रुप आणि इंडिगो यांचा सध्या देशांतर्गत प्रवासी बाजारपेठेत ९० टक्क्यांहून अधिक वाटा आहे.