Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केले २३ टन सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 03:40 IST

भारतीयांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी २३ टन सोन्याची खरेदी केली.

मुंबई : भारतीयांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी २३ टन सोन्याची खरेदी केली. गेल्या वर्षी याच मुहूर्तावर झालेल्या खरेदीपेक्षा यंदा चार टन सोने जास्त विकले गेले आहे, असे इंडिया ब्युलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय चिटणीस सुरेंद्र मेहता यांनी सांगितले.बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संपूर्ण देशातच सोन्याचे भाव घसरल्याने सोने खरेदीचा मोठा उत्साह होता. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, येत्या महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. २० फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावाने १० गॅ्रममागे ३४,०३१ रुपयांवर उडी घेतली होती. ते म्हणाले की, अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी सोने १० गॅ्रममागे ३१,५६३ रुपयांवर गेले होते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या खरेदीला मोठाच वेग आल्यावर बुधवारी त्याच्या किमतीत चांगलीच वाढ झाली. बुधवारी मुंबईच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅम मागे ३२,७०० रुपये होता. तो मंगळवारी २५५ रुपयांनी स्वस्त होता. २४ कॅरेटच्या सोन्याचा भाव १० ग्रॅममागे २५५ रुपयांनी वाढून ३२,८५० रुपयांवर गेला.

टॅग्स :सोनंअक्षय तृतीयाभारत