India-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाचा परिणाम भारत-रशिया व्यापारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. ताज्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये रशियातूनभारताच्या आयातीत तब्बल ४०.४८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑयल) आयातीला बसला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एका वर्षापूर्वी भारताने रशियाकडून ४.८१ अब्ज डॉलर किमतीची आयात केली होती, मात्र ती आता २.८६ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. अमेरिकेचा दबाव, वाढीव टॅरिफ आणि व्हेनेझुएलाकडून तेलपुरवठा वाढण्याची शक्यता...या सगळ्यांचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घसरण
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असे. रशियाकडील एकूण आयातीत कच्च्या तेलाचा वाटा सुमारे ८० टक्के होता. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत भारताने रशियाकडून सवलतीत मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केले. परिणामी भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत रशियाचा वाटा ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. एप्रिल २०२५ मध्ये भारताने रशियाकडून ४.७३ अब्ज डॉलर किमतीचे तेल आयात केले होते. मात्र जानेवारी २०२६ मधील आकडेवारीनुसार रशियन कच्च्या तेलाची आयात सुमारे २.३ अब्ज डॉलर्सवर आली आहे.
रशियाकडील आयात का घटली?
या मोठ्या घसरणीमागे भारत आणि अमेरिका व्यापार करार महत्त्वाचा मानला जात आहे. या कराराअंतर्गत भारतावर लागू असलेला ५० टक्के टॅरिफ कमी करून थेट १८ टक्के करण्यात आला. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लादलेला २५ टक्के दंडात्मक टॅरिफही अमेरिकेने हटवला. त्याबदल्यात भारताने पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून ऊर्जा आणि तंत्रज्ञान आयात वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी आपला द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
व्हेनेझुएलाकडे भारताचा कल
भारताच्या मोठ्या रिफायनिंग कंपन्या हळूहळू रशियाकडील कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करत आहेत. ६८ दशलक्ष टनांहून अधिक वार्षिक रिफायनिंग क्षमतेची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी ९ जानेवारी रोजी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जानेवारीत रशियाकडून शून्य कच्च्या तेलाच्या डिलिव्हरीची अपेक्षा व्यक्त केली होती. तज्ज्ञांच्या मते, रिफायनर्स जसे-जसे व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाकडे वळतील, तसे रशियाकडील आयातीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, २०१२-१३ मध्ये भारत व्हेनेझुएलन तेलाचा मोठा खरेदीदार होता. त्या काळात भारताने १४.१० अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल आयात केले होते. मात्र २०२१-२२ मध्ये भू-राजकीय अस्थिरता आणि निर्बंधांमुळे आयात अडचणीत आली. दरम्यान, ३१ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या व्हेनेझुएलाकडील मोठ्या प्रमाणावरील कच्च्या तेल खरेदीचा जाहीर उल्लेख केल्याने, रशियाकडील तेलपुरवठ्यातील घसरण आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : US pressure led to a 40% drop in India's Russian oil imports in January 2026. Crude oil imports were hit hardest. Increased tariffs and potential Venezuelan supply also contributed to the decline. Reliance anticipates zero Russian crude deliveries.
Web Summary : अमेरिकी दबाव के चलते जनवरी 2026 में भारत का रूसी तेल आयात 40% गिरा। कच्चे तेल के आयात में भारी गिरावट आई। टैरिफ में वृद्धि और वेनेजुएला से आपूर्ति की संभावना ने भी योगदान दिया। रिलायंस को रूसी तेल की डिलीवरी शून्य होने की उम्मीद है।