भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान शत्रूसोबत उभं राहणं तुर्कस्तानला महागात पडलं आहे. त्यामुळे तुर्कस्तानच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलाय. यामुळे गेल्या महिन्याभरात तुर्की एअरलाइन्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईनंतर तुर्कस्ताननं पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर अनेक भारतीय प्रवाशांनी तुर्कस्तान दौरा रद्द केला. मेक माय ट्रिपनुसार, तुर्कस्तानला जाणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे. रद्द होण्याचे प्रमाण २५० टक्क्यांनी वाढलं आहे.
महिनाभरात तुर्की एअरलाइन्सच्या शेअरमध्ये १०.५५ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचं कारण भारतीय पर्यटकांची उड्डाणं रद्द होणं आणि भारतातून तुर्कस्तानला जाणारी नवीन बुकिंग कमी होणं. भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम तुर्कस्तानच्या पर्यटन उद्योगावर स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर तुर्कस्ताननं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं भारतीय प्रवाशांमध्ये राग दिसून येत आहे. याचा थेट परिणाम तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. मेक माय ट्रिपने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कस्तानला जाणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे. तर, कॅन्सलेशन रेटमध्ये २५० टक्क्यांनी वाढ झालीये.
मोठ्या प्रमाणात दौरे
ईज माय ट्रिपचे संस्थापक आणि अध्यक्ष निशांत पिट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये २.८७ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानला भेट दिली. हा आकडा २०२२ मधील २.३ लाख पर्यटकांच्या तुलनेत २५% जास्त आहे. प्रत्येक भारतीय पर्यटकासाठी १२०० ते १५०० डॉलर (सुमारे १,०२,६०० ते १,२८,२०० रुपये) खर्च येतो, असा अंदाजही पिट्टी यांनी व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानमध्ये एकूण अंदाजित खर्च ३५० ते ४०० मिलियन डॉलर (सुमारे ३,००० कोटी रुपये) दरम्यान केला होता.
शेअर्स आपटले
तुर्की हवा योल्लारी एओ किंवा तुर्की एअरलाइन्सचे शेअर्स ३१२.७५ तुर्की लीरावरून २७९.७५ तुर्की लीरापर्यंत घसरले, जे १०.५५% घसरण दर्शवते. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अविनाश गोरक्षकर यांनी मिंटला दिलेल्या माहितीनुसार, तुर्की एअरलाइन्सच्या शेअरच्या किंमतीत दबाव येण्याचं कारण म्हणजे भारतीय पर्यटकांची फ्लाईट कॅन्सलेशन्स आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कस्तान पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिल्यानं भारतातून तुर्कस्तानला जाणाऱ्या नव्या बुकिंगवरही मोठा परिणाम झाला. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर विमान कंपन्यांच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता गोरक्षकर यांनी वर्तवली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)