Budget 2025 Gold Silver Price : सोन्याच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. हा मौल्यवान धातू लवकरच लाखाचा टप्पा पार करेली असेही वाटत आहे. अशा परिस्थितीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी विशेष घोषणा केली. अर्थसंकल्पात सरकारने यावरील कस्टम ड्युटी २५ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली. सरकारने प्लॅटिनम धातूवरील कस्टम ड्युटी देखील २५ टक्क्यांवरून 5 टक्के कमी केली आहे. हे बदल आजपासून लागू करण्यात आले आहे.
सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किमती कमी होणार?
कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त होतील. कारण, आयात केलेले दागिने आणि मौल्यवान धातूंचे सुटे भाग स्वस्त होतील. ज्वेलर्सनी सांगितले की, कमी वजनाचे सोने आणि इतर धातूंचे दागिने हे इटली आणि पाश्चात्य देशांतून येणारे अनब्रँडेड दागिने स्वस्त होतील. यामध्ये टिफनी, बुलगारी, कार्टियर सारख्या टॉप ब्रँड्सच्या दागिन्यांचा देखील समावेश आहे. आयात केलेले दागिने स्वस्त झाल्याने त्याची मागणी वाढणार आहे.
स्वतंत्र एचएस कोडचा प्रस्ताव
सरकारने प्लॅटिनम आणि सोन्याच्या मिश्र धातुंसाठी स्वतंत्र एचएस कोड देखील प्रस्तावित केला आहे. प्लॅटिनम आणि सोन्याच्या मिश्र धातुंसाठी स्वतंत्र एचएस (हार्मोनाइज्ड सिस्टम) कोडची तरतूद हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
सोन्याच्या दागिन्यांची आयात वाढली
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची आयात वाढली आहे. सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. २०२३ मधील याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर २०२४ मध्ये सोन्याच्या दागिन्यांची आयात ८७.४% वाढली आहे. आयात केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने चेन, कानातले आणि अंगठ्या यांचा समावेश होतो.
सोन्याचा भाव काय?
दिल्लीच्या सराफा बाजारात शनिवारी सोन्याचा भाव ८४,९०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर स्थिर राहिला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली. १ जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याचा भाव ५५१० रुपयांनी म्हणजे ७ टक्क्यांनी वाढला आहे. तर शनिवारी चांदी ७०० रुपयांनी मजबूत होऊन ९५७०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.