Sonam Raghuvanshi : एकेकाळी साधी पिठाची गिरणीचा व्यवसाय असलेल्या एका कुटुंबावर आज हवाला नेटवर्क आणि संशयास्पद व्यवहारांचे गंभीर आरोप होत आहेत. ही कहाणी आहे देवी सिंह रघुवंशी यांच्या कुटुंबाची, ज्यांची मुलगी सोनम रघुवंशी सध्या शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्या कुटुंबावर मनी लाँड्रिंगपासून ते संशयास्पद बँक खात्यांपर्यंत अनेक गंभीर आरोप आहेत. पण प्रश्न असा आहे की, पिठाच्या गिरणीचे मालक असलेल्या या कुटुंबाकडे कोट्यवधींची संपत्ती आली तरी कशी?
साध्या पिठाच्या गिरणीतून कोट्यवधींची माया कशी कमावली?देवी सिंह रघुवंशी हे मूळचे उत्तर प्रदेशचे. ते इंदूरमधील गोविंद नगर येथे आले आणि एका पिठाच्या गिरणीत काम करू लागले. त्यानंतर त्यांनी प्लायवुड व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीला अडचणी आल्या तरी, त्यांनी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करून कंपनीला पुन्हा उभे केले. आज ही कंपनी इंदूरमधील मंगल सिटीमध्ये "बालाजी प्लायवुड" म्हणून ओळखली जाते, जिथे सोनम आणि तिचा भाऊ गोविंद रघुवंशी काम पाहत होते.
सूत्रांनुसार, सोनम आणि गोविंदने मिळून मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात प्लायवुडचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला. या कुटुंबाने नुकतेच इंदूरमध्ये ४,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे एक मोठे गोदाम भाड्याने घेतले आहे. एकेकाळी अतिशय साधे जीवन जगणारे हे कुटुंब आता कोट्यवधींची मालमत्ता आणि आलिशान जीवनशैलीचे मालक बनले आहे.
नातेवाईकांच्या नावावर बँक खाती आणि संशयास्पद व्यवहारया प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सोनमने तिच्या अशिक्षित नातेवाईकांच्या नावावर अनेक बँक खाती उघडली. यामध्ये तिच्या चुलत भावाच्या (जितेंद्र रघुवंशी) नावावर तब्बल चार खाती होती, ज्यातून लाखो रुपयांचे व्यवहार केले जात होते. एवढेच नाही तर, तिने राज कुशवाहाच्या आईच्या नावावरही एक बँक खाते उघडले होते.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, या सर्व खात्यांचा वापर हवाला आणि इतर संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी केला असण्याची शक्यता आहे. मेघालय पोलीस सध्या या सर्व बँक खात्यांची सखोल चौकशी करत आहेत.
राजा रघुवंशी खून प्रकरणात कनेक्शन?सोनम सध्या राजा रघुवंशी खून प्रकरणात प्रमुख संशयित आहे. पीडित राजाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सोनम आणि तिचे कुटुंब हवाला रॅकेटमध्ये सामील आहेत आणि त्यांनी काळ्या पैशाचे मोठे साम्राज्य वेगाने उभे केले आहे.
राजा रघुवंशी यांचे भाऊ सचिन यांनी माध्यमांना सांगितले की, "हा केवळ खून खटला नाही. ही पद्धतशीर फसवणूक आणि काळ्या धंद्याचा खटला आहे, ज्याची सखोल चौकशी झाली पाहिजे."
या सगळ्या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
- सोनमच्या कुटुंबाने इतक्या कमी वेळात कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली?
- अशिक्षित नातेवाईकांच्या नावावर बँक खाती का उघडण्यात आली?
- प्लायवुड व्यवसायाच्या नावाखाली खरोखरच हवाला रॅकेट चालवले जात होते का?
वाचा - स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जाईल, तसतशी यामागची सत्यता समोर येईल अशी अपेक्षा आहे.