Join us

देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 08:15 IST

वस्तू व सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील, अशी घोषणा देशातील प्रमुख बांधकाम व विकासक संघटना ‘क्रेडाई’ने केली.

नवी दिल्ली  : सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील, अशी घोषणा देशातील प्रमुख बांधकाम व विकासक संघटना ‘क्रेडाई’ने केली आहे. त्यामुळे देशातील घरे स्वस्त होणार आहेत.

क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कर कपातीमुळे होणाऱ्या खर्चातील बचतीचा किती भाग ग्राहकांपर्यंत पोहचवता येईल, यावर विकासक विचार करीत आहेत.

३ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने सिमेंट, स्टील, टाइल्स, इतर फिनिशिंग साहित्यावरील जीएसटी कराचा दर कमी केला. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा होईल. २२ सप्टेंबरपासून जीएसटी लागू होईल. त्यानंतर जीएसटीमध्ये ५ आणि १८ टक्के असे दोन दर राहतील. 

घर खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटी ठरतेय मोठे ओझे

सिमेंटवरील जीएसटीत १० टक्के कपात झाल्यास ३५० रुपये किमतीची सिमेंट बॅग सुमारे ३० रुपयांनी स्वस्त होऊ शकते. टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये कपातीचा फायदा जास्त जाणवेल. मेट्रो शहरांमध्ये मात्र परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे. 

स्टॅम्प ड्युटी मात्र अजूनही घर खरेदीदारांसाठी मोठे ठरणारे ओझे आहे. “स्टॅम्प ड्युटी आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्यात राज्य सरकारांनी गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. इतर खर्च कमी केले तरीही स्टॅम्प ड्युटीचे ओझे घर खरेदीदारांवर राहील,” असे इराणी म्हणाले.

टॅग्स :बांधकाम उद्योगसुंदर गृहनियोजनजीएसटीकर