Join us  

आता कार खरेदी करणे झाले सोपे, 'ही' बँक देतेय 30 मिनिटांत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 6:31 PM

car loan : या सेवेअंतर्गत ग्राहकांना यापुढे कारसाठी कर्ज घेण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन असून अवघ्या 30 मिनिटांत ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार फायनान्सची सुविधा मिळणार आहे.

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC) बँकेने ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी कर्ज (Car Loan) देण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना यापुढे कारसाठी कर्ज घेण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन असून अवघ्या 30 मिनिटांत ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार फायनान्सची सुविधा मिळणार आहे.

देशात सध्या अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत एचडीएफसी बँकेने ही सेवा सुरू केली आहे. बँकेने या सेवेला एक्सप्रेस कार लोन (Xpress Car Loan) असे नाव दिले आहे. बँकेचा दावा आहे की,  भारतातील नाही तर कदाचित संपूर्ण जगात अशी ही पहिलीच सेवा आहे. या सेवेअंतर्गत एचडीएफसी बँक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना 30 मिनिटांच्या आत कर्ज देईल. सध्या, कारसाठी कर्ज मिळविण्यासाठी साधारणपणे 48 ते 72 तास लागतात.

इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, कर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये 'गृहकर्जा'नंतर सर्वाधिक ग्राहक 'कार कर्ज' घेत आहेत. नवीन झटपट सेवा सुरू केल्याने 2022-23 या आर्थिक वर्षात 10 हजार ते 15 हजार कोटी रुपयांपर्यंतची कार कर्जे वितरित करण्यास सक्षम असण्याची अपेक्षा बँकेला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यानंतर दुचाकींसाठीही वित्तपुरवठा करण्यासाठी संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याची योजना आहे.

'सेवा बाजारपेठेत गेम चेंजर ठरेल''एक्स्प्रेस कार लोन' सेवेमुळे कारसाठी कर्ज घेणे सोपे होईल. हे विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत गेम चेंजर ठरेल, असे एचडीएफसी बँकेचे रिटेल अॅसेट्सचे कंट्री हेड अरविंद कपिल यांनी सांगितले. तसेच, भारतातील 90 टक्के लोक ऑनलाइन कार खरेदी करण्याची तयारी सुरू करतात, मात्र यापैकी केवळ 2 टक्के लोक संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करतात. आमच्या विद्यमान ग्राहकांपैकी किमान 20-30 टक्के ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांनी एक्सप्रेस कार लोनद्वारे या सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे, असेही अरविंद कपिल म्हणाले. 

टॅग्स :एचडीएफसीकारपैसावाहनव्यवसाय