Haldiram Funding: नमकीन, भुजिया आणि मिठाई बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हल्दीराम स्नॅक्सवर (Haldiram Snacks Food) सध्या परदेशातून पैशांचा वर्षाव होत आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन जायद (Sheikh Tahnoon bin Zayed) यांनीही एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीये. हल्दीराम स्नॅक्समधील सुमारे सहा टक्के हिस्सा ते विकत घेणार आहेत. हा करार सुमारे ५,१६० कोटी रुपयांचा म्हणजेच सुमारे ६०० मिलियन डॉलर्स इतका आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये हिंडेनबर्गच्या आरोपांदरम्यान (Hindenburg) गौतम अदानी यांना २ अब्ज डॉलरची मदत केली होती.
कोण आहेत शेख तहनुन?
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन जायद हे फर्स्ट अबू धाबी बँक पीजेएससीचे अध्यक्ष आहेत. तहनुन यांचं व्यावसायिक साम्राज्य सुमारे १.५ ट्रिलियन डॉलर्सचं आहे. अल्फा वेव्ह ग्लोबल (Alpha Wave Global) असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचं नाव पूर्वी फाल्कन एज कॅपिटल (Falcon Edge Capital) होतं. याच कंपनीनं हल्दीराममधील सुमारे ६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चिमेरा कॅपिटलसोबत (Chimera Capital) करार केलाय. या गुंतवणुकीनंतर अल्फा वेव्ह ही हल्दीराममध्ये गुंतवणूक करणारी दुसरी कंपनी ठरणार आहे. अल्फा वेव्हनं २०२२ मध्ये सर्वात मोठा व्हेंचर फंड उभा केला. ही कंपनी इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सलाही सपोर्ट करते.
आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड
सिंगापुरच्या कंपनीचीही गुंतवणूक
यापूर्वी सिंगापूरची गुंतवणूक कंपनी टेमासेकनं हल्दीराममधील सुमारे ९ टक्के हिस्सा खरेदी केला होता. टेमासेकनं हा करार ८६,००० कोटी रुपयांच्या मूल्यावर केला होता. हल्दीराम चालवणारी अग्रवाल कुटुंबातील ही तिसरी पिढी आहे. अल्फा वेव्हच्या गुंतवणुकीनंतर हल्दीराममधील प्रवर्तकांचा एकूण हिस्सा १५ टक्क्यांवर येईल. हा करार देशातील खासगी इक्विटीचा सर्वात मोठा ग्राहक करार असेल.
नमकीन तयार करणारी मोठी कंपनी
हल्दीरामही भारतातील सर्वात मोठी नमकीन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी बिकाजी फूड्स, बिकानेरवाला, पेप्सिको आणि आयटीसी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते. हल्दीराम ५०० हून अधिक स्नॅक्स, मिठाई, रेडी टू ईट फूड आणि पेयांची विक्री करते. कंपनीनं २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२,८०० कोटी रुपयांचा महसूल मिळवला. त्याचा एबिटडा २,५८० कोटी रुपये आणि निव्वळ नफा १,४०० कोटी रुपये होता. यामुळे कंपनीचं मूल्यांकन विक्रीच्या ६.७ पट झालंय.
दोन्ही युनिट्सचं विलिनीकरण
हल्दीराम चालवणाऱ्या अग्रवाल कुटुंबानं यापूर्वीच राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) मंजुरीनं नवी दिल्ली आणि नागपूर युनिटचं विलीनीकरण केलं आहे. भारतीय स्पर्धा आयोगानं (CCI) गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विलीनीकरण योजनेला मंजुरी दिली होती. कंपनीतील हिस्सा विक्रीची पूर्वसूचना म्हणून व्यवसाय पुनर्रचनेकडे पाहिल जात होतं.