Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा जोरदार तेजी, अमेरिकेच्या 'या' आकडेवरीचा दिसला मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:11 IST

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचं सत्र सुरूच आहे. युद्धासोबतच यावेळी अमेरिकेनं जाहीर केलेली एक आकडेवारीही कारणीभूत ठरली आहे.

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचं सत्र सुरूच आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीमुळे किमतींवर पुन्हा एकदा परिणाम झाला. या ताज्या आकडेवारीमुळे अमेरिकन सेंट्रल बँकेवर व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव १०४ डॉलरनं वधारून ५,१८२ डॉलर प्रति ट्रॉय औंसवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर ३.१५ डॉलरने वाढून ८५.३३ डॉलर प्रति ट्रॉय औंस झालाय.

घरगुती बाजारातील स्थिती

भारतीय बाजारपेठेचा विचार केल्यास, एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स २,८३९ रुपयांच्या उसळीसह १,६२,५१२ रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीचे मे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स ८,३०९ रुपयांनी वधारून २,७०,५०० रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

इराण-इस्रायल युद्धामुळे रशियाची चांदी; धडाधड यु-टर्न घेताहेत रशियन तेलाचे टँकर, दोन भारताकडेही निघाले

अमेरिकेत ९२,००० लोकांच्या नोकऱ्या गेल्या

अमेरिकेतील ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ९२,००० लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तज्ज्ञांना ५०,००० नोकऱ्या जातील अशी अपेक्षा होती, मात्र हा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे बेरोजगारीचा दर ४.४ टक्क्यांवर पोहोचलाय. रोजगाराची ही कमकुवत आकडेवारी अमेरिकन सेंट्रल बँकेला व्याजदर कमी करण्यास भाग पाडू शकते.

सराफा बाजारातील शुक्रवारी झालेली घसरण

सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत १,१०० रुपयांनी घसरून १.६४ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर आली होती. चांदीदेखील घसरून २.७१ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत १ टक्क्यानं (१,१०० रुपये) कमी होऊन करांसह १,६४,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली होती. तसंच, चांदी ६०० रुपयांनी स्वस्त होऊन २,७१,७०० रुपये प्रति किलोवर आली होती.

तज्ज्ञांच्या मते, किमतीत झालेल्या प्रचंड वाढीनंतर नफावसुली केल्यामुळे ही किरकोळ घसरण पाहायला मिळाली. लेमन मार्केट्स डेस्कचे रिसर्च एक्सपर्ट गौरव गर्ग यांनी सांगितलं की, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला कल यामुळे शुक्रवारी किमतीत लक्षणीय चढ-उतार दिसून आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Surge Again: US Jobs Data Fuels Rally

Web Summary : Gold and silver prices are soaring due to US jobs data, pressuring the Federal Reserve to cut interest rates. Global tensions are also boosting prices. MCX gold futures jumped, while silver futures also saw a significant rise. Previous day saw a minor price drop.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसा