Join us

गौतम अदानींची मोठी झेप; अंतराळ क्षेत्रात उतरणार, इलॉन मस्कच्या SpaceX शी स्पर्धा करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:59 IST

Gautam Adani: सध्या खासगी अंतराळ क्षेत्रात इलॉन मस्कच्या SpaceX चे वर्चस्व आहे.

Gautam Adani: गौतम अदानी यांनी उर्जा, बंदरे, पायाभूत सुविधा, रिन्यूएबल एनर्जी, सिमेंट...अशा विविध क्षेत्रात उद्योग उभारले आहेत. आता अदानी समूह अंतराळ क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतातील सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV) तयार करण्याच्या शर्यतीत अदानी समूह तीन अंतिम स्पर्धकांपैकी एक आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या दोन सरकारी कंपन्याही या शर्यतीत आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास आगामी काळात अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी अदानी डिफेन्स सिस्टीम्सच्या नेतृत्वाखाली SSLV तयार करू शकते.

इस्रोने बनवले SSLV रॉकेट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने बनवलेले हे एसएसएलव्ही एक छोटे रॉकेट आहे. हे बनवण्यासाठी खूप कमी खर्च येतो. याच्या मदतीने 500 किलो वजनाचे छोटे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित केले गेले आहेत. सध्या सॅटेलाइट लॉन्च मार्केटमध्ये या सेगमेंटला खूप मागणी आहे.

SpaceX चे वर्चस्व भारत सरकारने 2023 मध्ये SSLV च्या पहिल्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्याचे उत्पादन आणि तंत्रज्ञानाची जबाबदारी खाजगी उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला. देशाच्या व्यावसायिक अवकाश क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने आणि सध्या SpaceX चे वर्चस्व असलेल्या जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजाराला स्पर्धा देण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल होते. एसएसएलव्ही करारासाठी 20 कंपन्यांनी बोली लावली होती.

यामध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग प्रॉसेस, SSLV ची डिझाईन आणि क्वालिटी अशोरन्स प्रशिक्षणाशी संबंधित बारकावे समजून घेण्यासाठी इस्रोला अंदाजे 3 अब्ज रुपये द्यावे लागतील. या 24 महिन्यांच्या करारामध्ये तांत्रिक सहाय्य आणि दोन यशस्वी प्रक्षेपण देखील समाविष्ट आहेत. हे खासगीकरण देशाच्या अवकाश उद्योगासाठी गेम चेंजर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :गौतम अदानीएलन रीव्ह मस्कइस्रोनासा