Join us

RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:24 IST

shaktikanta das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

shaktikanta das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर आता नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शक्तीकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्त झालेले दास ६ वर्ष गव्हर्नर पदावर होते. आता निवृत्तीनंतर काही महिन्यांमध्येच त्यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे. सध्या प्रमोद कुमार मिश्रा (पीके मिश्रा) हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव-1 आहेत. त्यांच्यासोबत आता शक्तिकांता दास प्रधान सचिव-2 च्या भूमिकेत दिसणार आहेत. शक्तीकांता दास हे १९८० च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) सांगितले की दास यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत असणार आहे. एसीसीच्या आदेशानुसार, शक्तिकांत दास पंतप्रधान यांचे प्रधान सचिव डॉ. पीके मिश्रा यांच्यासोबत प्रधान सचिव म्हणून काम करतील.

आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कारकीर्द कशी होती?शक्तीकांत दास डिसेंबर २०१८ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत ६ वर्षे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख होते. त्यांना चार दशकांहून अधिक काळातील शासनाच्या विविध क्षेत्रांचा व्यापक अनुभव आहे. वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात, कोविड-१९ साथीदरम्यानचे आर्थिक परिणाम आणि रशिया-युक्रेन युद्धाचा भडका यासह अनेक महत्त्वपूर्ण आव्हानांमध्ये आरबीआयचे नेतृत्व केले.

कोण आहेत शक्तिकांता दास?दास यांनी त्यांच्या ६ वर्षांच्या आरबीआय कार्यकाळातील शेवटच्या ४ वर्षात आर्थिक विकास दर ७ टक्क्यांहून अधिक राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले दास हे महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिवही राहिले आहेत. आरबीआयमधून निवृत्त झाल्यानंतर, त्यांना १५व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे G20 शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दास यांना सुमारे ४ दशके शासनाच्या विविध क्षेत्रात काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. 

टॅग्स :शक्तिकांत दासनरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँक