Join us

ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:02 IST

Ford Coming Back To India: चार वर्षांपूर्वी बंद केलेला आपला प्रकल्प कंपनी पुन्हा सुरू करणार आहे आणि तेथे हाय-एंड इंजिन तयार केलं जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'मेक इन अमेरिका' (Make in America) धोरणाला जोरदारपणे पुढे नेत असताना हा निर्णय आला आहे.

Ford Coming Back To India: अमेरिकेची ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्ड मोटर कंपनी (Ford Motor Co.) भारतात सुमारे ३२.५० अब्ज रुपयांची (३७० मिलियन डॉलर्स) गुंतवणूक करणार आहे. चार वर्षांपूर्वी बंद केलेला आपला प्रकल्प कंपनी पुन्हा सुरू करणार आहे आणि तेथे हाय-एंड इंजिन तयार केलं जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'मेक इन अमेरिका' (Make in America) धोरणाला जोरदारपणे पुढे नेत असताना हा निर्णय आला आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की, कंपनी या गुंतवणुकीची औपचारिक घोषणा याच आठवड्यात करू शकते.

फोर्डनं १९९५ मध्ये चेन्नईजवळ आपला पहिला प्रकल्प सुरू केला होता आणि २०१५ मध्ये गुजरातमधील साणंद येथे दुसरा प्लांट सुरू केला होता. जिम फार्ले जेव्हा २०२० मध्ये फोर्डचे सीईओ बनले, तेव्हा त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसोबतची प्रस्तावित भागीदारी रद्द केली. त्यानंतर त्यांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत भारतीय बाजारातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले होते की कंपनी आता भारत आणि ब्राझीलसारख्या कमी किंवा नफा नसलेल्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. भारताबाहेर पडेपर्यंत फोर्डला २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. यानंतर कंपनीनं साणंद येथील वाहन प्रकल्प टाटा मोटर्सला विकला.

₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ

तामिळनाडूतील संयंत्र पुन्हा सुरू करणार

सूत्रांनुसार, फोर्ड तामिळनाडूमध्ये स्थित आपला जुना मराइमलाई नगर (Maraimalai Nagar) येथील प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाला पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानानं पुन्हा तयार केलं जाईल, जेणेकरून तिथे निर्यातीसाठी हाय-परफॉर्मन्स इंजिन तयार करता येतील. या संयंत्राची क्षमता दरवर्षी २ लाखाहून अधिक इंजिन बनवण्याची असेल. तथापि, ही इंजिनं कोणत्या देशांना निर्यात केली जातील हे सध्या स्पष्ट नाही, पण एवढं निश्चित आहे की त्यांची निर्यात अमेरिकेला केली जाणार नाही.

भारतावर पुन्हा विश्वास

फोर्डचे हे पाऊल कंपनीचे सीईओ जिम फार्ले (Jim Farley) यांच्या नवीन रणनीतीचा भाग आहे, जे भारताला पुन्हा एकदा जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) म्हणून पाहत आहेत. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव वाढलेला आहे. दरम्यान, ट्रम्प हे अमेरिकेत उत्पादन वाढवण्याच्या बाजूने आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, फोर्डनं अमेरिकेबाहेर उत्पादन वाढवण्याची योजना आखली तेव्हा त्यांनी फोर्डवर टीका केली होती. अलिकडच्या वर्षांत, फोर्डने अमेरिकेतील प्रकल्पांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली तेव्हा ट्रम्प यांनी तिची प्रशंसा देखील केली.

भारतातील अमेरिकन कंपन्यांची वाढती गुंतवणूक

अलीकडील महिन्यांत वाढत्या राजकीय तणावामुळेही, अनेक अमेरिकन कंपन्या भारतात आपला मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणून मजबूत करत आहेत. मे २०२५ मध्ये ट्रम्प यांनी अॅपल (Apple Inc.) कंपनीला भारतात उत्पादन सुरू केल्याबद्दल लक्ष्य केले होते, परंतु असं असूनही कंपनीनं भारतातील आपल्या पाच प्रकल्पांमध्ये आयफोन (iPhone) उत्पादन वाढवलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ford returns to India, restarting factory after Trump criticism.

Web Summary : Ford reinvests in India, restarting a closed factory to manufacture high-end engines for export. Despite Trump's 'Make in America' push and previous criticism, Ford sees India as a global manufacturing hub, joining other US firms expanding operations.
टॅग्स :फोर्डडोनाल्ड ट्रम्पगुंतवणूककारचेन्नईफोर व्हीलर