Fastag Annual Pass: जर तुम्ही दररोज किंवा वारंवार महामार्गांवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ पासून, सरकार प्रवाशांना टोल भरण्याच्या त्रासातून मुक्त करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅगसाठी (FASTag) एक नवीन वार्षिक पास सुरू करण्याची घोषणा केली आहे.
३,००० रुपयांमध्ये वर्षभर टोल फ्री!या पासची किंमत फक्त ३,००० रुपये असेल आणि तो तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग (NE) वरील टोल प्लाझावर वर्षभर किंवा २०० टोल-फ्री ट्रिपसाठी वैध असेल. या दोन्हीपैकी जी अट आधी पूर्ण होईल, तोपर्यंत हा पास काम करेल. हा पास खास करून अशा प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे, जे वर्षातून सुमारे २०० वेळा महामार्गावरून प्रवास करतात. यामुळे त्यांना वारंवार टोल भरावा लागणार नाही आणि रिचार्जचा त्रासही वाचेल.
हा पास कोणासाठी आहे?
- हा पास फक्त खाजगी कार, जीप आणि व्हॅनसाठी आहे.
- व्यावसायिक वाहनांसाठी (उदा. ट्रक, टेम्पो) हा पास लागू नाही.
- हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या हद्दीत येणाऱ्या टोल प्लाझावर वैध असेल.
- राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांच्या महामार्गांवर हा पास काम करणार नाही. तिथे नेहमीप्रमाणे टोल भरावा लागेल.
पास कसा मिळवायचा?
- वार्षिक टोल पास खरेदी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही तो घरबसल्या ऑनलाइनही मिळवू शकता.
- तुमच्याकडे तुमच्या खाजगी वाहनासाठी (कार, जीप किंवा व्हॅन) वैध आणि कार्यान्वित FASTag असणे आवश्यक आहे.
- हा पास तुम्ही 'राजमार्ग यात्रा' ॲप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइट (www.nhai.gov.in) वरून खरेदी करू शकता.
- तुम्हाला ३,००० रुपयांची रक्कम तुमच्या FASTag वॉलेटमधून किंवा त्याला जोडलेल्या बँक खात्यातून भरावी लागेल.
- पेमेंट आणि पडताळणीनंतर, हा पास तुमच्या FASTag शी जोडला जाईल आणि १५ ऑगस्ट २०२५ पासून तो आपोआप सक्रिय होईल.
वाचा - जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
हा पास नियमित प्रवाशांसाठी एक मोठी सोय ठरेल, ज्यामुळे वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होईल.