EPF Pension : EPFO च्या करोडो ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संसदेच्या एका समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान निवृत्ती वेतन 1,000 रुपयांवरुन 7,500 रुपये करण्याची शिफारस केली आहे. 2014 मध्ये केंद्र सरकारने EPFO ग्राहकांसाठी किमान पेन्शन 250 रुपयांवरुन 1,000 रुपये प्रति महिना केली होती. परंतु, किमान पेन्शन दरमहा किमान 7,500 रुपये करावी, अशी मागणी कामगार संघटना आणि पेन्शनर्स संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत.
न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, भाजप खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला EPFO च्या कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत (EPS) किमान पेन्शन वाढवण्याची विनंती केली आहे. सध्या ही पेन्शन दरमहा एक हजार रुपये आहे. समितीने यापूर्वीही ही शिफारस केली होती, आता त्याचा पुनरुच्चार केला आहे.
गेल्या 11 वर्षांपासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. 2014 च्या तुलनेत 2024 मध्ये महागाई अनेक पटींनी वाढली असून, त्यानुसार पेन्शनमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. आर्थिक परिणाम लक्षात घेऊन निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यापक हितासाठी सरकारने तातडीने हे करणे आवश्यक आहे.
पेन्शनमधून किती पैसे कापले जातात?खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ पगारावर 12 टक्के कपात EPF खात्यासाठी केली जाते. याशिवाय कंपनी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी 8.33 टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) मध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम EPF मध्ये जाते.