Join us

Employment: मार्च महिन्यामध्ये वाढले रोजगार, बेरोजगारीचा दर घटला; हरयाणात सर्वाधिक २६.७ टक्के बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 06:18 IST

Employment Update: फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात अधिक रोजगार उपलब्ध झाले असून बेरोजगारीचा दर घटला आहे. असे असले तरी हरयाणामध्ये बेरोजगारी सर्वाधिक म्हणजे २६.७ टक्के आहे. कनार्टक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर प्रत्येकी १.८ टक्के असा सर्वात कमी आहे. 

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात अधिक रोजगार उपलब्ध झाले असून बेरोजगारीचा दर घटला आहे. असे असले तरी हरयाणामध्ये बेरोजगारी सर्वाधिक म्हणजे २६.७ टक्के आहे. कनार्टक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर प्रत्येकी १.८ टक्के असा सर्वात कमी आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार मार्च महिन्यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर ७.६ टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा दर ८.१० टक्के होता. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव, निर्बंध कमी झाल्यामुळे सुरू झालेले अधिक उद्योगधंदे यामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. त्याचा परिणाम म्हणून बेरोजगारीचा दर कमी झाल्याचे या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी कमी-जास्त प्रमाणात आहे. मार्च महिन्यामध्ये शहरी भागातील बेरोजगारी ८.५ टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारी ७.१ टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे तेथील नागरिक शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र, शहरातही त्यांना कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात. त्यामुळे शहरातील बेरोजगारीचा दर जास्त असल्याचे मत भारतीय सांख्यिकी संस्थेतील अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक अभिरूप सरकार यांनी व्यक्त केले आहे. कोरोनानंतर आता अर्थव्यवस्था रूळावर येऊ लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  मागील वर्षाच्या मे महिन्यात देशामध्ये बेरोजगारीचा दर ११.८४ टक्के असा सर्वाधिक होता. या काळामध्ये देशात कोरोनाची लाट सुरू असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले होते.

उत्तरेमध्ये बेरोजगारी अधिकउत्तर भारतामधील विविध राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या अहवालामध्ये हरयाणात सर्वाधिक म्हणजे २६.७ टक्के बेरोजगारी असल्याचे नमूद आहे. राजस्थान आणि जम्मू व काश्मीरमध्ये हे प्रमाण प्रत्येकी २५ टक्के तर बिहारमध्ये १४.४ टक्के आहे. त्रिपुरामध्ये १४.१ टक्के नागरिकांना काम नाही. पश्चिम बंगालमध्ये हा दर ५.६ टक्क्यांपर्यंत कमी आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर सगळ्यात कमी म्हणजे १.८ टक्के एवढा आहे.

टॅग्स :कर्मचारीनोकरीभारत