Join us

इलॉन मस्कची मोठी घोषणा! ट्विटर डील तात्पुरती स्थगित; नेमकं कारण काय? जाणून घ्या, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:47 IST

इलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

वॉशिंग्टन: जगातील बडे उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) सोशल मीडियावरील आघाडीचा प्लॅटफॉर्म असलेली ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट विकत घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, ट्विटर विकत घेण्याची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले आहेत. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

इलॉन मस्क यांनी ट्विटरची ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्विट करून सांगितले आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युजर्सबाबतही त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. तसेच ट्विटरवर एडीट बटण देण्यासंदर्भातही हालचाली सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. इलॉन मस्क यांनीच तशा आशयाचा एक पोल ट्विटरवर घेतला होता. 

नेमकं कारण काय?

आताच्या घडीला ट्विटरवर ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत. या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्याने ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र, मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर