Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात सॅटेलाईटवरून इंटरनेट सेवा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीला आवश्यक परवानाही मिळालाय. पण सरकारनं या कंपनीवर काही विशेष निर्बंध लादले आहेत. टेलिकॉम राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टारलिंक भारतात केवळ २० लाख कनेक्शन देऊ शकेल. याचं कारण म्हणजे या कंपनीकडे स्पेक्ट्रमचा तुटवडा आहे. यामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या देशांतर्गत कंपन्यांना तुर्तास धोका नाही.
बीएसएनएलच्या बैठकीत पेम्मासानी यांनी ही माहिती दिली. स्टारलिंकचा प्लान महिन्याला सुमारे ३,००० रुपयांचा असू शकतो. हे जिओ आणि एअरटेलपेक्षा महाग आहे. परंतु सॅटेलाइट इंटरनेटच्या बाबतीत हा प्लान ठीक आहे. स्टारलिंक भारतात केवळ २० लाख ग्राहकांना सेवा देऊ शकणार आहे. याचा स्पीड २०० एमबीपीएसपर्यंत असेल. यामुळे दूरसंचार सेवेवर परिणाम होणार नाही.
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
स्टारलिंकची क्षमता
स्टारलिंक १०० पेक्षा जास्त देशांमध्ये ५० लाखांहून अधिक लोकांना सेवा देते. भारतात २० लाख ग्राहक मिळाले तर ही कंपनीसाठी मोठी गोष्ट असेल. ज्या दुर्गम भागात बीएसएनएलसारख्या कंपन्या नीट पोहोचू शकत नाहीत, तिथे सॅटेलाईट इंटरनेट उपयोगी पडेल. स्टारलिंकची नेटवर्क क्षमता अजूनही कमी असल्यानं त्याच्या कनेक्शनची संख्या मर्यादित असेल, असं एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं.
त्यांनी सांगितलं की स्टारलिंकचे ४,४०८ उपग्रह पृथ्वीपासून ५४०-५७० किलोमीटर अंतरावर कक्षेत फिरतात. याच्या मदतीनं आपण भारतात ६०० Gbps स्पीड मिळवू शकतो. कंपनीला सध्या परवाना ५ वर्षांसाठी मिळाला आहे. मस्क यांच्या कंपनीला दूरसंचार विभागाकडून परवाना आणि INSPACE कडून मान्यता मिळाली आहे. आता कंपनी भारतात आपल्या पायाभूत सुविधा उभारेल. ती उपकरणे आयात करण्यासाठी दूरसंचार विभागाची परवानगी घेईल.