Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:12 IST

elon musk appeals : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. पण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता मस्क अडचणीत आले आहेत.

elon musk appeals : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन इलॉन मस्क यांच्यातील सख्य अवघ्या जगाला माहिती आहेत. ट्रम्प यांच्या निवडणुकीत मस्क यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. निवडून येताच ट्रम्प यांनी लगेच मानाचं पान देत मस्क यांना मंत्री केलं. मात्र, ट्रम्प यांच्या एका निर्णयाने आता इलॉन मस्क हेच गोत्यात आले आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लागू केलं आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर किमान १० टक्के टॅरिफ लागू करण्यात आले आहे. मात्र, यामुळे जगभरात व्यापीर युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका इलॉन मस्क यांच्या व्यवसायलाही बसत आहे. लोक रस्त्यावर उतरून टेस्ला शोरुमच्या बाहेर आंदोलन करत आहेत. अखेर मस्क यांना राष्ट्राध्यक्षांकडे विनंती करावी लागली आहे.

जगात व्यापारी युद्धाची भिती वाढली?अमेरिकेने अनेक देशांना शुल्क मागे घ्या अन्यथा रेसिप्रोकल शुल्क (जशास तसे) लादण्याची धमकी दिली आहे. यानंतर चीनसारख्या देशांनीही अमेरिकेवर टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर जगभरात व्यापार युद्धाची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर खुद्द इलॉन मस्क यांनीच आक्षेप घेतला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मस्क यांनी नवीन टॅरिफ धोरण मागे घेण्यासाठी थेट राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. पण, यानंतरही ट्रम्प यांच्या निर्णयात फार फरक पडलेला दिसत नाही.

मस्क व्यवसायाबाबत गंभीरइलॉन मस्क ट्रम्प सरकारमध्ये मंत्री असले तरी पहिल्यांदा ते व्यावसायिक आहेत. गेल्या काही दिवसांपासून टेस्लाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहेत. लोक बायकॉट टेस्ला अशी मोहीम चालवत आहेत. व्यापारावरून इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये जेव्हा मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध शुल्काला आव्हान देण्यासाठी खटला दाखल केला. तेव्हा देखील दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

मस्क ट्रम्प यांच्या नवीन धोरणाच्या समर्थनात होतेमस्क यांनी सुरुवातीला ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाचे समर्थन केले होते. पण, हा निर्णय आपल्याच व्यवसायाला बाधक असल्याचे समजताच त्यांनी यू टर्न घेतला आहे. टॅरिफ धोरणाने मस्क यांचे आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. यात फक्त मस्कच नाही तर इतर उद्योजकांनीही टॅरिफ मागे घेण्याची विनंती केली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, जगातील काही आघाडीच्या व्यावसायिक नेत्यांचा एक गट एक अनौपचारिक युती तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट ट्रम्प यांना हे धोरण रद्द करण्यासाठी भेटणार असल्याची माहिती आहे.

वाचा - रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

ट्रम्प यांच्या धोरणांचा टेस्लावर वाईट परिणामअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन टॅरिफ धोरणाचा जगभरात नकारात्मक परिणाम होत आहे. जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर दिसून आला आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पएलन रीव्ह मस्कअमेरिकाटेस्लाशेअर बाजार