Join us
Daily Top 2Weekly Top 5

ED Action: लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला ८५ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:52 IST

ED Action On Rajendra Lodha: रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.

ED Action On Rajendra Lodha: रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) कंपनीचे माजी संचालक राजेंद्र लोढाला ८५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणात अटक केली. राजेंद्र लोढांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आणि बेकायदेशीरपणे मालमत्ता जमा केली, असा आरोप ईडीनं केलाय.

तुरुंगातूनच घेण्यात आलं ताब्यात

राजेंद्र लोढा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोंदवलेल्या अन्य एका प्रकरणात गेल्या वर्षी सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत होते. गुरुवारी ईडीनं त्यांना पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर केलं आणि अधिकृतपणे अटक केली. शुक्रवारी त्यांना रिमांडसाठी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल. मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या फसवणूक आणि बनावटगिरीच्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

Bank of Baroda कडून १ कोटींचं Home Loan: किती पगार असणं आवश्यक? जाणून घ्या पात्रता आणि अटी

तपासातून प्रकरणाचा उलगडा

तपासादरम्यान असं समोर आलंय की, २०१५ मध्ये कंपनीचे संचालक बनलेल्या राजेंद्र लोढा यांच्याकडे केवळ जमीन संपादनाचे मर्यादित अधिकार होते. मात्र, त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन अनेक अनधिकृत व्यवहार केले. राजेंद्र यांनी आपला मुलगा साहिल लोढा आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं कंपनीच्या पैशांचा अपहार करण्याचा कट रचल्याचा दावा ईडीनं केलाय. यामध्ये बनावट ताबाधारक दाखवून आणि खोटे करार करून कंपनीचा निधी रोख स्वरूपात काढण्यात आला. त्यांनी कंपनीच्या संसाधनांचा वापर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या खाजगी फायद्यासाठी केला आणि आपल्या सहकाऱ्यांना कवडीमोल भावात फ्लॅटचं वाटप केल्याचं सांगण्यात आलंय.

१० कोटींची जमीन, अवघ्या ४८ लाखांत विक्री

या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब जमिनींच्या खरेदी-विक्रीत समोर आली आहे. पनवेलमधील कंपनीची ४,१५० चौरस मीटर जमीन, ज्याचं बाजारमूल्य सुमारे १० कोटी रुपये होते, ती एका बनावट कंपनीला अवघ्या ४८ लाख रुपयांना विकण्यात आली. यामुळे कंपनीचं थेट ९.५० कोटी रुपयांचं नुकसान झालं. याशिवाय, 'उषा प्रॉपर्टीज' आणि 'श्रीराम रिअल्टीज' सारख्या शेल कंपन्यांद्वारे आधी जमिनी खरेदी केल्या गेल्या आणि नंतर त्या लोढा डेव्हलपर्सला चढ्या दरानं विकल्या गेल्या.

मृत कर्मचाऱ्याच्या नावावरही फसवणूक

तपास यंत्रणेला आणखी एक गंभीर प्रकार आढळून आला आहे. २०१३ मध्ये कंपनीचा कर्मचारी मंगेश पुराणिक याच्या नावावर जमीन खरेदी करण्यात आली होती. मंगेशच्या मृत्यूनंतर ती जमीन फसवणुकीनं लोढाच्या सहकाऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आणि नंतर मोठ्या नफ्यासह पुन्हा कंपनीलाच विकली गेली. ईडीच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकारांमुळे कंपनीचं एकूण ८५ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ED arrests Lodha ex-director in ₹85 crore fraud case.

Web Summary : ED arrested Rajendra Lodha, ex-director of Lodha Developers, for ₹85 crore fraud. He misused his position, illegally acquired assets, and defrauded the company via unauthorized land deals and shell companies, causing significant financial losses.
टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयगुन्हेगारी