पंतप्रधान आवास योजना-शहरीभाग (PMAY-U) च्या लाभार्थ्यांसाठी एकूण १.१८ कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये शुक्रवारी देण्यात आली. शहरी भागात कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये PMAY-U ची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर, एक कोटी अतिरिक्त कुटुंबांना मदत करण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये पीएमएवाय-यू २.० लाँच करण्यात आली आहे.
जाणून घ्या सविस्तर - आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये म्हणण्यात आले आहे की, "२५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत एकूण १.१८ कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत. यांपैकी १.१४ कोटी घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ८९ लाखहून अधिक घरे तयार झाली आहेत." सध्या २९ राज्ये आणि संघशासित प्रदेशांमध्ये पीएमएवाय-यू २.० लागू करण्यासाठी करार झाले आहेत.
काय आहे योजना -पीएमएवाय-यू २.० योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) / कमी उत्पन्न गट (एलआयजी) / मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) या श्रेणीत येणाऱ्या लोकांनाच मिळेल. याच बरोबर, लाभार्थ्याचे देशात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे. असे लोक PMAY-U 2.0 अंतर्गत घर खरेदी करण्यास अथवा बांधण्यास पात्र असतील. महत्वाचे म्हणजे, पीएमएवाय-यू २.० ही योजना, लाभार्थी आधारित बांधकाम (बीएलसी), याशिवाय, भागीदारीत परवडणारी घरे (एएचपी), परवडणाऱ्या भाडेपट्टीची घरे (एआरएच) आणि व्याज अनुदान योजना (आयएसएस) अंतर्गत राबविण्यात येते.
अशी आहे व्याज अनुदान योजना -व्याज अनुदानासंदर्भात बोलायचे झाल्यास, यात ईडब्ल्यूएस/एलआयजी आणि एमआयजी कुटुंबांसाठी गृहकर्जावर अनुदान दिले जाते. ३५ लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना विशेष सुविधा मिळते. अशा लाभार्थ्यांना १२ वर्षांच्या कालावधीसाठी ८ लाख रुपयांच्या पहिल्या कर्ज रकमेवर ४ टक्के व्याज अनुदान मिळेल. पात्र लाभार्थ्यांना ₹१.८० लाखांचे अनुदान ५ वर्षिक हप्त्यांमध्ये पुश बटणच्या माध्यमाने दिले जाईल. योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, लाभार्थी आपल्या पात्रतेनुसार एक घटक निवडू शकतात.