Join us
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १.१० कोटींचा दंड, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:35 IST

डीजीसीएने बुधवारी काही लांब मार्गांवर चालणाऱ्या फ्लाइट्सच्या संदर्भात सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्याविमानांमधील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने बुधवारी काही लांब मार्गांवर चालणाऱ्या फ्लाइट्सच्या संदर्भात सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, एअरलाइन कर्मचाऱ्याकडून ऐच्छिक सुरक्षा अहवाल मिळाल्यानंतर नियामकाने तपशीलवार तपासणी केली. काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे. डीजीसीएने याबाबत सांगितले की, एअर इंडियाने काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवल्या जाणार्‍या विमानामध्ये सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून सुरक्षा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर या उल्लंघनांची व्यापक तपासणी करण्यात आली. तपासणीत एअर इंडिया सुरक्षा मानकांचे पालन न केल्याबद्दल दोषी आढळली. तपास अहवालाच्या आधारे कंपनीच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

काही दिवसांपूर्वीच इंडिगोलाही ठोठावण्यात आला दंड!याआधी काही दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरच प्रवासी जेवायला बसले होते. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि ते कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणात इंडिगो या कंपनीला आणि मुंबई विमानतळ संचालक यांना मिळून १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातला १ कोटी २० लाख रुपयांचा दंड हा इंडिगोला तर ६० लाखांचा दंड हा मुंबईत विमानतळ संचालक मंडळाला भरावा लागला.

टॅग्स :एअर इंडियाविमान