Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:05 IST

Cyber Crime : नवीन वर्षाचे निमित्त साधून सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसवण्यासाठी नवीन ट्रॅप तयार केला आहे. यात तुम्हीही अडकण्याची शक्यता आहे.

Cyber Crime Alert : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज आहे. तुम्ही देखील काहीतरी प्लॅन आखला असेलच. याच संधीचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी नवीन ट्रॅप तयार केला आहे. 'हॅप्पी न्यू इयर' असे लिहिलेले आकर्षक डिझाईनचे मेसेज आणि त्यासोबत असलेल्या संशयास्पद 'लिंक्स'द्वारे नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जाण्याची भीती सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, सायबर शाखेने देशभरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शुभेच्छांच्या मेसेजमध्ये नेमका धोका काय?सायबर गुन्हेगारांकडून सण-उत्सवांच्या काळात 'फिशिंग' तंत्राचा वापर केला जातो. तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे मेसेज येतात. त्यासोबत "तुमची भेट वस्तू पाहण्यासाठी येथे क्लिक करा" अशा लिंक्स असतात. या लिंकवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलचा ताबा गुन्हेगारांकडे जाऊ शकतो किंवा मोबाईलमध्ये 'मालवेअर' डाऊनलोड होऊन तुमच्या बँकिंग व्यवहारांची माहिती चोरली जाऊ शकते. गेल्या वर्षी अशा अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात शुभेच्छांच्या लिंकवर क्लिक करताच काही सेकंदात खातेदारांचे पैसे गायब झाले होते.

सायबर पोलिसांचे 'सेफ्टी' मॅन्युअल

  • अनोळखी लिंक टाळा : अनोळखी नंबरवरून आलेल्या शुभेच्छांच्या लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका.
  • सिम लॉक ठेवा : गुन्हेगार तुमच्या सिम कार्डचा वापर करून ओटीपी मिळवू शकतात, त्यामुळे सिम कार्डला 'पिन' किंवा 'लॉक' ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • सरकारी योजनांचे आमिष : नवीन वर्षात नवीन सरकारी योजना सुरू झाल्याचे सांगून तुमची वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागितले जाऊ शकतात, अशा फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका.
  • मुलांनाही जागरूक करा : मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांना अनोळखी लोकांशी बोलण्यापासून आणि गेमिंगमधील संशयास्पद ऑफर्सपासून दूर राहण्यास सांगा.

वाचा - चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?

पोलिसांची विशेष मोहीम

सायबर पोलीस ठाण्याकडून सोमवारपासून सोशल मीडियावर व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. "सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या आनंदाचा फायदा घेतात, त्यामुळे सावधगिरी हाच एकमेव बचाव आहे," असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. जर तुमची फसवणूक झाली तर त्वरित १९३० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beware! Happy New Year greetings can empty your bank account.

Web Summary : Cyber police warn against clicking suspicious 'Happy New Year' links. These links can install malware, steal banking details, and drain accounts. Be cautious of unknown links, secure SIM cards, and distrust fraudulent schemes. Report fraud immediately to helpline 1930.
टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीपोलिस