Join us  

Coronavirus रतन टाटांनी दोन्ही केलं... कोरोनाविरुद्धचा अंध:कार दूर करण्यासाठी 'दिवा'ही लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:47 AM

देशात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यातही मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत.

मुंबई - टाटा उद्योग समूह आणि रतन टाटा हे देशाच्या प्रत्येक लढाईत हिरीरीने सहभागी होतात. नुकतेच टाटा उद्योग समुहाने तब्बल १५० कोटी रुपयांची मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी देशाला देऊ केली. तर, अशा अनेक संकटांमध्ये टाटांचा पुढाकार असतो. देशहितासाठी आर्थिकदृष्ट्या असो वा इतर श्रद्धेने ते देशावरील आपली श्रद्धा, निष्ठा आणि देशप्रेम आपल्या कृतीतून दाखवून देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत रतन टाटा यांनीही सहभाग घेतला. रतन टाटा यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रतन टाटांनी निधी दिला अन् दिवाही लावला. 

देशात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यातही मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. आणीबाणीची परिस्थती असल्याने अनेक डॉक्टरांना घरी जाणेही अशक्य झाले. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावल्याचे आपण पाहिले. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी टाटा समूहाने आपल्या पंचतारांकित हॉटेलचे दरवाजे उघडले. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संसर्गाचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांच्या निवासस्थानाची सोय करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र टाटा समूहाने डॉक्टरांच्या राहण्याची सोय केल्याने प्रशासनासमोरील मोठा प्रश्न दूर झाला. तसेच, यापूर्वी कोरोनाविरोधातील लढाईसाठी टाटा समूहाने सुमारे दीड हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर मुंबईतील विविध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भोजन पुरवण्याची व्यवस्था टाटा समूहाने केली आहे.

रतन टाटा आणि टाटा समूहाच्या या दानशूर आणि देशप्रेमाच्या भावानेवर नेटीझन्स नेहमीच फिदा होतात. त्यामुळे, टाटा यांनी १५०० कोटी रुपयांची मदत घोषित केल्यानंतर, टाटा नमक... देश का नमक... अशा टॅगलाईन टाकून अनेकांनी रतन टाटा यांचा फोटो शेअर केला होता. आता, हातात दिवा घेऊन कोरोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी पुढे आलेल्या रतन टाटा यांचा दुसरा फोटो व्हायरल झाला आहे. ट्विटरवर अनेकांनी या फोटोसह, राष्ट्रहित.. देशभक्त... असे टॅग वापरून हा फोटो शेअर केला आहे. अनेकांनी मोदींच्या या आवाहनाला विरोध केला होता, पण रतन टाटा यांनी निधीही दिला अन् दिवाही लावला. आपल्या कृतीतून राष्ट्रहिताची प्रत्येक गोष्ट करायला आपण तयार असल्याच टाटा यांनी दाखवून दिलंय.

दरम्यान, लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे.

टॅग्स :रतन टाटाट्विटरकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदी