नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका केवळ चीनलाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच बसत असून, भारतातील विमानसेवा, पर्यटन, बॉलीवूड, वाहने व त्यांचे सुटे भाग आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व खेळणी यांच्या बाजारपेठेवरही त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.भारताने चीन व हाँगकाँगशी असलेली विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे एअर इंडिया व इंडिगो यांची विमाने चीनला जाणे पूर्णत: थांबले आहे. अनेक विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे पैसे परत करण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे, शिवाय महसूल येणेही थांबले आहे. एक विमान चीनला जाऊ न परत आल्यास सुमारे ५५ ते ७२ लाख रुपये महसूल मिळतो. तो थांबल्याने विमान कंपन्या अडचणीत आल्या आहेत.
आॅटोमोबाइल उद्योग धास्तावलागेले वर्षभर वाहन उद्योग संकटात होता. फारशी वाहने गेल्या वर्षी विकलीच गेली नाहीत. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादन कमी केले आणि अनेकांचे रोजगार गेले. डिसेंबरनंतर या उद्योगात काहीशी धुगधुगी यायला सुरुवात झाली, तोच कोरोना विषाणूने वाहन उद्योगालाही ग्रासले आहे. मारुती, ह्युंदाईसह अनेक कंपन्या वाहनांचे सुटे भाग प्रामुख्याने चीनमधूनच आयात करतात. ही आयात कमी आहे, पण विशिष्ट भाग केवळ चीनमध्येच तयार होतात. ते मिळाले नाहीत, तर त्यामुळे वाहन रस्त्यावर येऊ च शकत नाही, अशी स्थिती आहे.एकट्या चीनमधून गेल्या वर्षी सुमारे चार लाख पर्यटक आले होते. याखेरीज हाँगकाँगहून येणारे व चीनमार्गे अन्य देशांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. काही वर्षांत चीनहून येणाºया पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असताना, कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्याला बाधा आली. हा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवेल, असे पर्यटक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा फटका आंतरराष्ट्रीय, तसेच आंतरर्देशीय विमान कंपन्या, हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, ड्युटी फ्री शॉप्स या सर्वांना बसायला सुरुवात झालीच आहे, शिवाय व्हिसाद्वारे जी रक्कम मिळते, तीही बंद झाली आहे.हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या प्रकारे कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. अनेक हिंदी चित्रपट चीनमध्ये भरपूर पैसा कमावतात. दंगल, थ्री इडियट्स, बाहुबली, बजरंगी भाईजान, सीक्रेट सुपरस्टार, सुलतान, पद्मावत आदी चित्रपटांनी चीनमध्ये कोट्यवधी रुपये कमावले आहेत, पण कोरोनामुळे चीनमधील सर्व म्हणजे ७0 हजार चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे तिथून पैसा कमावू पाहणारी हिंदी चित्रपटसृष्टीही अडचणीत आली आहे.