India China Relation : भारतानं आपल्या शेजारी चीनशी संबंध सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ड्रॅगनचा विश्वासघातकी स्वभाव बदलताना दिसत नाही. जगात भारताचा वाढता प्रभाव आणि चीनला पर्याय बनण्याचा त्याचा प्रयत्न शेजाऱ्यांना रुचलेला नाही. त्यानं असा खेळ खेळला ज्यामुळे भारतीय उद्योगाला ३२ अब्ज डॉलर्स (सुमारे २.७५ लाख कोटी रुपये) फटका बसू शकतो. या प्रकरणात सरकारनं हस्तक्षेप करावा, जेणेकरून येणारा धोका वेळेआधीच टाळता येईल, अशी विनंती उद्योगजगतानं केली आहे.
उद्योग संघटना आयसीईएने सरकारला आवाहन केलंय की, चीननं अशा अनेक उपकरणांची निर्यात बंद केली आहे, जी आपल्या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात वापरली जातात. त्यामुळे देशातील ३२ अब्ज डॉलरच्या निर्यातीशी निगडित उत्पादन धोक्यात आलंय. उद्योगांचं उत्पादन कमी झाल्यानं देशाच्या निर्यातीवर गंभीर संकट येऊ शकतं. तसंच मेक इन इंडिया आणि पीएलआयसारख्या योजनांनाही फटका बसू शकतो. या परिस्थितीमुळे भारताच्या निर्यातदारांची जगभरातील बाजारपेठांशी असलेली कनेक्टिव्हिटीही संपुष्टात येऊ शकते.
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
आपल्या तज्ज्ञांनाही रोखतोय चीन
चीननं भारतात निर्यात करण्यासाठी अनेक आवश्यक उपकरणं आणि खनिजं पाठवण्यास नकार दिला आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या तांत्रिक तज्ज्ञांना भारतीय उद्योगांशी सहकार्य करण्यापासूनही रोखलंय. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ही परिस्थिती भारतानं अलिकडेच मिळवलेल्या कामगिरीलाही धोकादायक ठरू शकते. याशिवाय, जागतिक मूल्य साखळीत भारताची वाढती विश्वासार्हता देखील धोक्यात येऊ शकते.
... हे पूर्णपणे नियोजित?
चीनने त्यांचे कोणतेही निर्यात निर्बंध लेखी स्वरूपात पारित केलेले नाहीत. चीन सरकारने ३ विशिष्ट ठिकाणी भारतीय निर्यातीवर परिणाम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे पूर्णपणे नियोजित आहे. यापैकी कोणत्याही निर्बंधांसाठी कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही, परंतु सर्व आदेश तोंडी सीमाशुल्क प्रशासनाला देण्यात आलेत. यापैकी कोणत्याही निर्बंधांमध्ये चीन सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचं दिसून येतं.
चीन आयफोनच्या मागे का लागलाय?
चीननं अॅपलला सर्वात जास्त त्रास दिला आहे, कारण ते त्यांचे बहुतेक उत्पादन चीनमधून भारतात हलवून येथे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. हेच कारण आहे की चीनच्या दबावामुळे अॅपलच्या उत्पादन कंपनी फॉक्सकॉनला भारतात काम करणाऱ्या आपल्या ३०० इंजिनिअर्सना परत पाठवावं लागलं. याचा परिणाम अॅपलच्या उत्पादनावर होण्याची अपेक्षा होती. तथापि, कंपनीनं इतर प्लांटमधील तज्ज्ञांना बोलावून याची भरपाई केली.